संशयितांचा शोध घेताना पोलिसांनी थेट जम्मू आणि काश्मीरच्या रणजी संघातील क्रिकेटपटूंची मध्यरात्री कसून चौकशी केल्याने या क्रिकेटपटूंमध्ये भीती पसरली होती.
‘क’ गटातील हैदराबादविरुद्ध सुरू असलेल्या रणजी सामन्याच्या शेवटच्या दिवशीच्या आदल्या रात्री पोलिसांनी क्रिकेटपटूंना झोपेतून उठवत त्यांची कसून चौकशी केली. जम्मू आणि काश्मीर संघातील अष्टपैलू खेळाडू समीउल्ला बेग याने हा सर्व प्रकार आपल्या ‘फेसबुक’वर टाकला आहे. तो म्हणतो, ‘‘संपूर्ण रात्र आम्ही झोपू शकलो नाही. आम्ही झोपेत असताना अचानक पोलिस मध्यरात्री १.१५च्या सुमारास हॉटेलमध्ये शिरले आणि एखाद्या संशयितांप्रमाणे आमची चौकशी सुरू केली. त्या हॉटेलमध्ये फक्त आमचा संघ वास्तव्यास असल्यामुळे आम्ही खोलीची दारे बंद केली नव्हती. गाढ झोपेत असताना बंदूकधारी पोलिस समोर दिसल्यामुळे आमची भीतीने पाचावर धारण बसली होती.’’
याबाबत जम्मू पोलिसचे महानिरीक्षक राजेश कुमार म्हणाले, ‘‘आम्ही जम्मूमधील सर्व हॉटेलांची तपासणी करत होतो. पोलिसांची ती नियमित कारवाई होती. त्या हॉटेलमध्ये जम्मू आणि काश्मीरचा रणजी संघ वास्तव्याला आहे, हे पोलिसांना माहीत नव्हते. त्यामुळे खेळाडूंची चौकशी होणे स्वाभाविक आहे.’’
पोलिसांनी दिलेली वागणूक अयोग्य होती, असे बेगचे म्हणणे आहे. ‘‘ही पोलिसांची नियमित तपासणी होती तर त्यांनी आमचा छळ केला नसता. जम्मू आणि काश्मीरच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण सामना आम्ही खेळत होतो. त्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंना पोलिसांकडून अशाप्रकारे मिळालेली वागणूक अयोग्य होती. छ’