Joe Root on Breaking Sachin Tendulkar Highest Runs Record: इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटने वादळी फटकेबाजी करत १५० धावांची खेळी केली आहे. या खेळीसह त्याने जॅक कॅलिस आणि रिकी पॉन्टिंग या दिग्गज खेळाडूंना मागे टाकत मोठा विक्रम आपल्या नावे केला. जो रूट आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. जो रूटने आतापर्यंत १३,४०९ धावा केल्या आहेत. त्याच्यापुढे आता फक्त सचिन तेंडुलकर आहे. रूटने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

जो रूटने १५७ सामन्यांमधील २८६ डावांमध्ये १३,४०९ धावा केल्या आहेत, तर सचिन तेंडुलकरने २०० सामन्यांमधील ३२९ डावांमध्ये १५,९२१ धावा केल्या आहेत. जो रूट आता सचिनचा सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम मोडण्यापासून २५१२ धावा मागे आहे.

जो रूटने २०१२ मध्ये भारताविरूद्ध नागपूर कसोटीत पदार्पण केलं होतं. रूटने सचिन तेंडुलकरसह खेळलेल्या त्या कसोटी मालिकेचा उल्लेख आपल्या वक्तव्यात केलेला आहे. जो रूट म्हणाला, “माझ्या जन्मापूर्वी सचिनने कसोटी पदार्पण केले आणि त्याच्याविरूद्ध एकाच मैदानावर खेळण्याची संधी मिळणं मोठी गोष्ट होती. ज्याच्याकडून आपण शिकत मोठे झालो, ज्याचं आपण कौतुक करत आलो, त्या खेळाडूला त्याच्याच शेवटच्या मालिकेत खेळताना प्रत्यक्षात पाहणं, हे विलक्षण होतं. भारताने विकेट गमावल्यानंतर प्रेक्षकांकडून त्याचं मैदानावर स्वागत होताना पाहणं खूप वेगळं आणि भावनिक होतं. तो एक संस्मरणीय अनुभव होता. मी त्याच्याबरोबर खेळलेली ती मालिका कधीच विसरणार नाही,” असं जो रूटने बीबीसी स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

जो रूट सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडण्याच्या विचारात आहे का? या प्रश्नावर रूट म्हणाला “या गोष्टीवर मी लक्ष केंद्रित करत नाही. अशा गोष्टी आपोआप घडतात. माझं मुख्य लक्ष सामन्यात विजय मिळवण्यावर असतं. कसोटी सामन्याच्या सुरुवातीला स्थिती पाहत संघाला भक्कम स्थितीत नेणं किंवा जर लक्ष्य गाठायचं असेल, तर त्या परिस्थितीत योग्य खेळ कसा करायचा यावर लक्ष असतं.”

“हे ऐकायला कदाचित थोडं कंटाळवाणं आणि रटाळ वाटेल, पण शेवटी इंग्लंडच्या विजयासाठी योगदान देताना मला हेच करावं लागणार आहे आणि याच कारणासाठी आपण हा खेळ खेळतो.”, असं जो रूट पुढे म्हणाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंग्लंडने चौथ्या कसोटीतील पहिल्याच डावात कमालीची फलंदाजी करत पहिल्याच डावात ३११ धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. इंग्लंडकडून जो रूटने १५० धावांची तर कर्णधार बेन स्टोक्सने १४१ धावांची शानदार खेळी केली.