स्वच्छ भारत अभियानासाठी आग्रही असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उद्देशाला, मध्य प्रदेशातील त्यांच्यात पक्षाच्या आमदाराने चक्क हरताळ फासला आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे शौचालयाची मागणी करणाऱ्या महिला खेळाडूला, भाजपचे भोपाळचे आमदार सुरेंद्रनाथ सिंह यांनी अपमानास्पद वक्तव्य करुन नव्या वादाला तोंड फोडलं आहे. खुशबू खान असं या खेळाडूचं नाव असून ती भारतीय महिला ज्युनिअर हॉकी संघाची गोलकिपर आहे.

खुशबू तिच्या कुटुंबासोबत भोपाळच्या जहांगिराबाद या भागात असलेल्या एका झोपडपट्टीत राहत होती. याठिकाणी खुशबूच्या परिवाराने आपल्यासाठी एक शौचालय उभारलं होतं. मात्र खुशबू राष्ट्रीय शिबीरासाठी भोपाळबाहेर गेली असताना स्थानिक अधिकाऱ्यांनी खान परिवाराचं शौचालय तोडून टाकलं. जानेवारी २०१७ साली घडलेल्या या घटनेनंतर खुशबूने नवीन शौचालयासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची मदत मागण्याचं ठरवलं. मुख्यमंत्री आपल्या परिवारासाठी योग्य ते पाऊल उचलतील असा आत्मविश्वास खुशबूने व्यक्त केला.

मात्र खुशबूने उचललेलं हे पाऊल स्थानिक भाजप आमदार सुरेंद्रनाथ सिंह यांच्या पचनी पडलं नाही. सुरेंद्रनाथ यांनी खुशबूच्या राहणीमानावरुन तिची खिल्ली उडवली आहे. “जर खुशबू चांगली खेळाडू असती तर ती झोपडीत राहत नसती, आतापर्यंत तिला सरकारी नोकरी मिळायला हवी होती.” खुशबूचे वडील हे रिक्षाचालक असून, या एकमेव कमाईच्या साधनावर ते आपला परिवार चालवतात. अशा परिस्थितीत सुरेंद्रनाथ सिंह यांनी खुशबूचं राहणीमान आणि तिच्या घरावरुन केलेलं वक्तव्य हे अपमानास्पद असल्याचं बोललं जातंय. सध्याच्या घडीला अनेक चांगल्या खेळाडूंची आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे. क्रिकेट व्यतिरीक्त भारतात अन्य खेळांमध्ये चांगला पैसा मिळत नाही, ही बाब आता जगजाहीर झाली आहे. त्यामुळे सुरेंद्रनाथ सिंह यांनी केलेलं वक्तव्य तर्काला अनुसरून नसल्याची टीका नेटकऱ्यांनी त्यांच्यावर केलेली आहे. त्यामुळे या प्रकारानंतर शिवराजसिंह चौहानांचं भाजप सरकार आता खुशबूला शौचालय मिळवून देतं का हे पहावं लागणार आहे.