scorecardresearch

‘तो’ झेल सुटला अन् भारताचा खेळ खल्लास, भर मैदानातच कर्णधार रोहित शर्मा भडकला, Video होतोय तुफान Viral

भारतीय संघाला विजयाची चाहूल लागली असतानाच ४३ व्या षटकात मोठा धक्का बसला. कारण…

‘तो’ झेल सुटला अन् भारताचा खेळ खल्लास, भर मैदानातच कर्णधार रोहित शर्मा भडकला, Video होतोय तुफान Viral
भर मैदानातच रोहित शर्मा खेळाडूंवर भडकला. (image-rohit sharma)

भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु झाली आहे. आज रविवारी ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर भारत-बांगलादेश यांच्यात अटीतटीचा सामना रंगला. भारताने प्रथम फलंदाजी करून बांगलादेशला १८६ धावांचं आव्हान दिलं होतं. कारण बांगलादेशी गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढं भारतीय फलंदाजांना चमकदार कामगिरी करता आली नाही. त्यामुळे भारताने ४१.२ षटकात फक्त १८६ धावांवरच मजल मारली. भारताने दिलेलं १८७ धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशच्या फलंदाजांच्याही भारतीय गोलंदाजांनी नाकी नऊ आणले होते. परंतु, के एल राहुल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी खराब क्षेत्ररक्षण केल्यामुळं मोक्याच्या क्षणी झेल सोडल्याचा फटका भारतीय संघाला बसला आणि बांगलादेशने ४६ षटकांत ९ बाद १८७ धावा करून सामना खिशात घातला.

….अन् कर्णधार रोहित शर्माचा पारा चढला

भारताने दिलेल्या १८७ धावांचं आव्हान पेलण्यासाठी उतरलेल्या बांगलादेशच्या खेळाडूंची भारतीय गोलंदाजांनी पुरती दमछाक केली होती. मात्र, भारतीय संघाला विजयाची चाहूल लागली असतानाच ४३ व्या षटकात मोठा धक्का बसला. शार्दुल ठाकूरचं षटक सुरू असताना थर्ड मॅनच्या दिशेनं मेहदी मिराजने फटका मारला. त्यावेळी मैदानात असलेल्या वॉश्गिंटन सुंदरला झेल पडकण्याची संधी होती. मात्र, खराब क्षेत्ररक्षणामुळं त्याला झेल पकडता आला नाही आणि मेहदी हसन मिराज बांगलादेशच्या विजयाचा शिल्पकार ठरला. खेळाडूंच्या या खराब कामगिरीमुळं रोहित शर्मा चांगलाच भडकला आणि मैदानातच त्याने खेळाडूंवर राग काढला. मेहदीचा झेल घेणं शक्य होतं पण सुंदरला ते जमलं नाही, हे पाहून रोहित वैतागला आणि भर मैदानातच त्याने what the f**K, Bhe*c**D अशा शब्दांचा उच्चार केला. रोहित खेळाडूंवर भडकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

इथे पाहा व्हिडीओ

के एल राहुलनंही झेल सोडला आणि….

मेहदी हसन मैदानात बांगलादेशला विजयाच्या दिशेनं घेऊन जात असतानाच त्याला के एल राहुलनेही जीवदान दिले. फाईन लेगच्या दिशेनं मारलेला चेंडू राहुलला पकडता आला नाही. शार्दुलच्या आखुड टप्प्यावर टाकलेल्या चेंडूवर राहुलने मेहदीचा झेल सोडला अन् बांगलादेशच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या. भारतीय खेळाडूंनी खराब क्षेत्ररक्षण केल्यामुळं कर्णधार रोहित शर्मा संतापला होता. मैदानात त्याने व्यक्त केलेला राग कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तसंच खेळाडूंच्या नावाने ट्रोलिंगही करण्यात आलं.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 22:32 IST

संबंधित बातम्या