मुंबई : महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेतर्फे मंगळवारी आयोजित केलेल्या घटनादुरुस्ती संदर्भातील ऑनलाइन विशेष सर्वसाधारण सभेला ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेसह नाशिक, औरंगाबाद, आदी जिल्ह्यांनी विरोध दर्शवला आहे. ही सभा प्रत्यक्षदर्शी घेण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.
राज्याच्या घटनेमध्ये महत्त्वाच्या दुरुस्ती करण्यासाठी संलग्न जिल्हा संघटनांकडून लेखी स्वरूपातील सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानंतर १५ जुलैला झालेल्या कार्यकारिणी समितीच्या सभेत या मसुद्याला मान्यता देण्यात आली. आता विशेष सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनंतर ही सुधारित घटना धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात दाखल केली जाईल. परंतु करोना साथीमुळे मंगळवारी होणाऱ्या ऑनलाइन सभेबाबतचे पत्र संघटनेचे सरकार्यवाह अॅड. आस्वाद पाटील यांच्या स्वाक्षरीनिशी सर्व जिल्हा संघटनांना पाठवण्यात आले आहे. मात्र घटना दुरुस्तीमधील मुद्दय़ांवर साधकबाधक चर्चा होण्याची नितांत आवश्यकता असल्यामुळे ती प्रत्यक्षदर्शी व्हावी, अशी विनंती करणारे पत्र ठाणे जिल्ह्य़ामार्फत अध्यक्ष कृष्णा पाटील आणि सरचिटणीस मालोजी भोसले यांनी पाठवले आहे. याच पत्रात घटनादुरुस्तीची समिती कोणत्या सभेत नेमण्यात आली आणि समितीमधील सदस्यांची नावे न कळवल्यामुळे जिल्हा संघटनांमध्ये संभ्रम असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.