‘क्रीडांगणे जायन्ते वीरा:’ म्हणजेच वीर क्रीडांगणावर निर्माण होतात. इंग्लंडचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या इंग्रजीतील एका सुविचाराचं हे संस्कृत रूप. सांगलीमधील जय मातृभूमी व्यायाम मंडळाचं हे ब्रीदवाक्य. परंतु हेच ब्रीदवाक्य जोपासत सांगलीतील कबड्डीचा प्रवास अथकपणे सुरू आहे. सांगली जिल्हा म्हणजे कबड्डीची खाण आहे. आता शहरात कबड्डीच्या विकासाचा वेग मंदावला आहे, तर ग्रामीण भागात वाढला आहे. सांगली जिल्ह्य़ाचा सध्याचा संघ पाहिल्यास ग्रामीण भागाचे वर्चस्व दिसून येते. सम्राट आणि इस्लामपूर व्यायामशाळा यांच्यात मैदानावरील वर्चस्वासाठी प्रामुख्यानं लढती रंगतात. याशिवाय कासेगावचे संघही त्यांना आव्हान देऊ लागले आहेत. कबड्डीच्या इतिहासात १९१८ ते २० दरम्यान महाराष्ट्रातील सातारा, पुणे, बडोदा, मुंबई, नागपूर आणि मिरज येथे या खेळाचे नियम तयार करण्यात आले होते, असा उल्लेख आढळतो. श्री अंबाबाई आणि भानू तालीम अशा शंभराहून अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या कार्यरत संस्था हुतूतू ते कबड्डीच्या प्रवासाच्या साक्षीदार आहेत. सांगलीच्या कबड्डीचा वेध घेणाऱ्या काही प्रातिनिधिक कबड्डी संघांचा घेतलेला हा वेध-

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्री अंबाबाई तालीम संस्था, मिरज

इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा मिरजच्या श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या वास्तूंमध्ये दिसून येतात. या संस्थेची स्थापना १९०१ मध्ये झाली, म्हणजे शंभराहून अधिक वर्षांचा वारसा या संस्थेकडे आहे. लोकमान्य टिळक हेसुद्धा एके काळी या संस्थेच्या कार्यक्रमाला हजर राहिले होते. त्यामुळे त्यांच्या मैदानाचं नाव ‘लोकमान्य टिळक क्रीडांगण’ ठेवण्यात आलं. याचप्रमाणे के. ब. हेगडेवार, स्वातंत्र्यवीर सावरकर, एस. राधाकृष्णन यांनीसुद्धा या संस्थेला भेट दिल्यावर व्यक्त केलेला अभिप्राय आजही त्यांच्याकडे आहे. याशिवाय संस्थेची व्यायामशाळा आणि कुस्तीचा आखाडासुद्धा आहे.

‘‘स्वातंत्र्याच्या आधीपासून हुतूतू आणि कुस्ती या खेळासाठी ही संस्था ओळखली जायची. कालांतरानं वैद्य म. द. करमरकर यांनी योग आणि मल्लखांबाला प्रांरभ केला. सर्कससम्राट हनुमंतराव देवल हेसुद्धा या संस्थेचेच. त्यामुळे अनेक कसरतीचे प्रकार इथे शिकवले जाऊ लागले. करमरकर आणि देवल यांनी राज्यातील अनेक भागांमध्ये या खेळांचा प्रचार-प्रसार केला. १९५९ मध्ये राष्ट्रपती भवनातही देशी खेळाची प्रात्यक्षिकं सादर करण्याचा मान या संस्थेला मिळाला होता. त्या वेळी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी अंबाबाई संस्थेच्या प्रात्यक्षिकांचं कौतुक केलं होतं,’’ अशी माहिती संस्थेचे संयुक्त सचिव सुबोध गोरे यांनी दिली.

‘‘१९६५ ते १९७५ या कालखंडात संस्थेतर्फे दर्जेदार कबड्डी स्पर्धाचं आयोजन केलं जायचं. पण कालांतरानं १९७८ ते २००३ पर्यंत हे संयोजन बंद झालं. सत्तर-ऐंशीच्या दशकात अंबाबाई तालीम संस्थेच्या कबड्डी संघाचं मैदानावर वर्चस्व असायचं. जयसिंग लाड, अरुण लाड, संजय भोकरे, बजरंग घोरपडे हे त्यांचे गाजलेले खेळाडू. शिस्तबद्ध संघ आणि कौशल्यासाठी हा संघ विशेष ओळखला जायचा. मात्र मधल्या कालखंडात कबड्डीपटू घडवण्याची प्रक्रिया रोडावली. आता मैदानावर आपले पुन्हा वर्चस्व निर्माण करण्यासाठी अंबाबाईचा संघ उत्सुक आहे. त्या काळात मुलींचा संघसुद्धा होता, आता मात्र तो नाही,’’ असे संस्थेचे पदाधिकारी अशोक काळे यांनी सांगितले.

जय मातृभूमी व्यायाम मंडळ, सांगली

देश स्वातंत्र्य होऊन प्रजासत्ताक भारताची निर्मिती होण्याच्या कालखंडात १९४९ मध्ये जय मातृभूमी व्यायाम मंडळाची निर्मिती झाली. स्वातंत्र्याचे वारे सर्वत्र वाहू लागल्यानं मातृभूमी हेच नाव निश्चित करण्यात आलं. सुरुवातीला हुतूतूपासून कबड्डीचा प्रवास सुरू झाला. सांगलीतील जुन्याजाणत्या संघांमध्ये मातृभूमीला स्थान दिलं जातं.

‘‘देवप्पा चिनप्पा चिप्रीकर, रघुनाथ माळी, विशाल चव्हाण, बाबासाहेब दुकाने, झाकी इनामदार, विकास कामटे, प्रशांत कांबळे, विकास आवळे, ताहीर नायकवडे, कौस्तुभ पवार यांच्यासारख्या असंख्य खेळाडूंनी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धामध्ये आपले कर्तृत्व दाखवले. अर्जुन पुरस्कार विजेते राजू भावसार, शिवछत्रपती पुरस्कार विजेते गणेश शेट्टी यांच्यासारख्या खेळाडूंनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर पराक्रम दाखवला. बापू झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वष्रे मातृभूमीचे खेळाडू घडत होते. आता एनआयएस प्रशिक्षक शैलेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य अविरत सुरू आहे,’’ अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अरुण दांडेकर यांनी दिली.

‘‘गुणवान खेळाडूंची खाण असल्यामुळे संधीच्या दृष्टिकोनातून अनेकांनी बाहेर पडून नवे संघ तयार केले. त्यामुळे अनेक संघांची मातृभूमी असा आमच्या संघाचा नावलौकिक आहे, असे म्हटल्यासही वावगे ठरणार नाही,’’ असे संस्थापक सदस्य देवप्पा चिनप्पा चिप्रीकर यांनी सांगितले.

तरुण भारत व्यायाम मंडळ, सांगली

नानासाहेब देवधर यांनी १९३० मध्ये निव्र्यसनी नागरिक आणि खेळाडूंची निर्मिती करण्याच्या उद्देशाने तरुण भारत व्यायाम मंडळाची बीजे रोवली. १९३२ मध्ये तरुण भारतने कुरुंदवाड येथील गणेशोत्सव आणि श्री भानू तालीम संस्थेने आयोजित केलेल्या हुतूतू स्पध्रेत विजेतेपद पटकावल्यावर या पर्वाला प्रारंभ केला. पुढे कबड्डी या खेळात मात्र मंडळाने मोठा नावलौकिक मिळवला आहे.

‘‘बच्चू हलवाई यांनी हुतूतूच्या काळात भारताच्या नेतृत्वाची धुरा वाहिली होती. त्यांना ‘बिजली’ म्हटलं जायचं. पापा शिंदे हे धिप्पाड देहयष्टीचे होते. याशिवाय सुनील कुंभार, विनोद चव्हाण, महेश पाटील, विजय साळुंखे हे गाजलेले खेळाडू तरुण भारतचेच. एके काळी त्यांचा महिलांचा संघही होता. महाराष्ट्राच्या संघात सात खेळाडू तरुण भारतच्या असायच्या. स्वाती खाडिलकर-करंदीकर, सुनीता कुलकर्णी, गोखले भगिनी, राणी जहांगीरदार, सविता कदम यांनी मैदाने गाजवली,’’ अशी माहिती मंडळाचे सचिव अभय खाडिलकर यांनी प्रकट केली.

‘‘वसंतदादा पाटील यांच्यामुळे संस्थेला तीन एकरची जागा मिळाली. बॅडमिंटन, तलवारबाजी, योगासने, टेबल टेनिस, तायक्वांदो, स्केटिंग, टेनिस, बास्केटबॉल अशा विविध खेळांसाठी येथे व्यवस्था आहे. सध्या तीन कबड्डीच्या मैदानांवर राजू कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसभर सराव सुरू असतो. तरुण भारतचा संघ जिल्हा अजिंक्यपद स्पध्रेत उपांत्यपूर्व किंवा उपांत्य फेरीपर्यंत संघाची मजल मारतो,’’ असे मंडळाचे अध्यक्ष शिवाजी सगरे यांनी सांगितले. १९८१ मध्ये राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा तरुण भारतच्याच यजमानपदाखाली झाली होती, त्या वेळी झालेल्या भारत-पाकिस्तान कसोटी सामन्याला प्रेक्षकांची प्रचंड गर्दी झाली होती.

 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kabaddi game in india part
First published on: 19-05-2017 at 03:25 IST