दक्षिण कोरियाच्या इनचॉन शहरात सुरू असलेल्या चौथ्या आशियाई इन्डोअर आणि मार्शल आर्ट्स क्रीडा स्पध्रेतील कबड्डीमध्ये भारताने दोन्ही गटांमध्ये आपली विजयी घोडदौड राखली आहे. पाकिस्तान संघाच्या गैरहजेरीमुळे पुरुष विभागात राऊंड रॉबिन लीग पद्धतीने सामने चालू असून, सोमवारी भारताने जपानचा ५०-२९ असा पराभव केला. याचप्रमाणे भारतीय महिला संघाने आपल्या अखेरच्या गट साखळी सामन्यात दक्षिण कोरियावर ६१-२६ असा दणदणीत विजय मिळवला.
अ‍ॅनसॅन सँगनोस्कू जिम्नॅशियम स्टेडियमवर चालू असलेल्या कबड्डी स्पध्रेत पुरुष विभागात भारताने आपल्या चौथ्या विजयाची नोंद केली. मंगळवारी भारताचा अखेरचा साखळी सामना इराणशी रंगणार आहे, तर बुधवारी साखळीमधील दोन सर्वोत्तम संघ सुवर्णपदकासाठी झुंजतील. सध्या इराण आणि भारताने चार सामन्यांत प्रत्येकी ८ गुण मिळवून अनुक्रमे पहिली दोन स्थाने राखली आहेत. महिला विभागात ‘ब’ गटात समाविष्ट असलेल्या भारताने आपल्या तिसऱ्या विजयासहित गटविजेत्याच्या थाटात उपांत्य फेरीत प्रवेश केला. मंगळवारी इराण विरुद्ध दक्षिण कोरिया आणि भारत विरुद्ध थायलंड यांच्यात उपांत्य फेरीचे सामने रंगणार आहेत.