कबड्डीला गरज सांख्यिकीची!

खेळाडूंचा वर्षभरातील लेखाजोखा पाहायाचा असेल, तर या सांख्यिकीची नितांत गरज आहे.

(संग्रहित छायाचित्र)
शशिकांत राऊत

‘खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरीची नोंद असावी की नसावी?’ सध्या तरी कबड्डीवर्तुळात यात दोन मतप्रवाह आहेत. काहींना ते अडचणीचे वाटते, तर काहींना यामुळे संघनिवडीत पारदर्शकता येईल असे वाटते. खरे तर या दोन्ही बाजू गौण आहेत. क्रिकेट, हॉकी, फुटबॉलच कशाला, अगदी खो-खोमध्येदेखील याची नोंद ठेवली जाते. मग कबड्डीतच याचा बाऊ  का केला जातो? आज काळाबरोबर चालायचे असेल तर या गोष्टीची नितांत गरज आहे.

खेळाडूंचा वर्षभरातील लेखाजोखा पाहायाचा असेल, तर या सांख्यिकीची नितांत गरज आहे. आपल्याला कबड्डी खेळाकडे क्रीडारसिकांना आकर्षित करावयाचे असेल, तर या आकडेवारीची नितांत गरज आहे. चढाईपटूने किती सामन्यांत गुणांचे शतक किंवा अर्धशतक पार केले. बचावाच्या खेळाडूने किती सामन्यात पकडीचे अर्धशतक पार केले. किती सामन्यांत, किती चढायांमध्ये तो हे सारे विक्रम पार करतो, हे यावरून काढता येते. मग एका खेळाडूचा विक्रम दुसरा खेळाडू कधी व कशा प्रकारे मोडतो, हेदेखील लक्षात येते. त्या खेळाडूंच्या गुणांची टक्केवारीदेखील यातून काढता येते. एखादा खेळाडू विक्रमाच्या जवळपास आला की तो खेळाडू कधी आणि कशा प्रकारे ते विक्रम मोडतो, याच्या उत्सुकतेपायी रसिकांची पावले आपसूक हा खेळ पाहण्यासाठी या स्पर्धेच्या ठिकाणी वळतील. अशा प्रकारच्या नोंदींमुळे सामन्यातील चुरस वाढेल. प्रो कबड्डी लीगने या आकडेवारीची सवय कबड्डीरसिकांना लावली आहे, हे नाकारता येणार नाही.

कबड्डीक्षेत्रात कागदावर या नोंदी केल्या जात आहेत. संगणकाच्या मदतीने अशा प्रकारे नोंदी काढण्याचे प्रयत्न झाले, पण ते फार खर्चीक व त्यात काही त्रुटी आढळून आल्या. यात परिपूर्णता येण्यासाठी पुन्हा नव्याने प्रयत्न व्हायला हवे व खर्चदेखील आटोक्यात आणायला हवा. या सर्व मुद्दय़ांवर फक्त चर्चा होते, पण गेल्या १४ वर्षांहून अधिक काळ होय-नाही यावरच गाडी अडखळत आहे. मुळात संघटक व पदाधिकारी यांची मानसिकता बदलायला हवी.

पंचाला साधी गुणपत्रिका नीट भरता येत नाही, तर तो सांख्यिकीची आकडेमोड काय करणार, असा सवाल कबड्डीमधील काही जाणकार विचारतात. यात तथ्यदेखील आहे. पण आजची पिढी ही उच्चशिक्षित आहेत. हा तरुणवर्ग या गोष्टी पटकन आत्मसात करतात. पूर्वी गुणपत्रिकेबाबत समजावणे कठीण कार्य असायचे, पण आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे ही मुले फार चौकस झाली आहेत. काही गोष्टींत त्यांच्याकडूनच सूचना यायला लागल्या आहेत. हे सुचिन्ह मानावे लागेल. पण या गुणपत्रिकेवर गुणलेखक म्हणून काम करताना एकाग्रता ही महत्त्वाची आहे.

कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना त्यात फायद्याबरोबर तोटेदेखील असणार. काही जणांना वाटते की याचा गैरफायदादेखील घेतला जाईल. पण सर्वानी एक गोष्ट लक्षात घ्यावयास हवी की, कोणत्याही संघाची निवड करताना निवड समिती सदस्य ती तो जागेनिहाय निवड करतो. त्याचबरोबर त्याची संघाला असलेली गरज, खेळातील कौशल्य, समयसूचकता, खेळाविषयीची निष्ठा, कठीणप्रसंगी त्याच्या खेळातील अचूकता आणि वर्षभरातील त्याची कामगिरी हे सर्वदेखील ध्यानात घेतले जाते. त्यामुळे या गोष्टींकरिता नाक मुरडण्यात काय अर्थ आहे?

स्वतंत्र सांख्यिकी विभाग हवा!

* कबड्डीमधील ही आकडेवारी नोंदवण्यासाठी पंचांना वेठीस न धरता सांख्यिकी हा स्वतंत्र विभाग असावा. पूर्वी खो-खोतदेखील सांख्यिकी म्हणून स्वतंत्र विभाग होता. त्याची वेगळी परीक्षा घेतली जात असे.

कबड्डी संघटकांनीदेखील अशा प्रकारे वेगळे विभाग करावेत. त्यांना स्वतंत्ररीत्या प्रशिक्षण द्यावे. क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीचा लेखाजोखा उपलब्ध आहे.

याचप्रमाणे सर्व आकडेवारीची राज्य कबड्डी संघटनेने साठवणूक करावी. जेणेकरून त्या खेळाडूचे नाव संगणकावर टाईप करताच ही सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल.

तंत्रज्ञानाच्या या युगात हे फार कठीण नाही, पण फक्त मानसिकतेत बदल करून सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे.

(लेखक कबड्डीतज्ज्ञ आहेत.)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kabaddi needs statistics