वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत अनेक वेळा महाराष्ट्राला विजेतेपदाने हुलकावणी दिली आहे. अजिंक्यपद मिळविण्याच्या दृष्टीने कसून सराव केला असून यंदा सर्वोत्तम कामगिरी करून दाखवू, असा आत्मविश्वास महाराष्ट्राची कर्णधार स्नेहल शिंदे हिने सांगितले. पाटणा येथे २१ जानेवारीपासून राष्ट्रीय स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची जबाबदारी प्रथमच स्नेहल हिच्याकडे सोपविण्यात आली आहे. तिची ही वरिष्ठ गटातील चौथी राष्ट्रीय स्पर्धा आहे.
प्रथमच महाराष्ट्राचे कर्णधारपद तुझ्याकडे सोपविण्यात आले आहे. याचे दडपण आहे काय?
नेतृत्वपदाची जबाबदारी प्रथमच माझ्याकडे आली असली तरी ही जबाबदारी समर्थपणे पार पाडण्याची क्षमता माझ्याकडे आहे. मुळातच दडपण घेत मी कधीच खेळत नाही. माझ्यासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो. त्यामुळेच प्रत्येक सामन्यात आत्मविश्वासाने खेळण्याचा माझा प्रयत्न असतो. त्याचा फायदा मी संघाला मिळवून देणार आहे.
आजपर्यंत अनेक वेळा महाराष्ट्राला विजेतेपदाने हुलकावणी दिली आहे. यंदा अजिंक्यपदासाठी काय प्रयत्न केले जाणार आहेत?
आजपर्यंत आम्ही रेल्वेकडूनच अधिक वेळा पराभूत झालो आहोत. गतवर्षी केवळ एक गुणाने आम्ही अंतिम लढत गमावली होती. यंदा या चुका टाळण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. रमेश भेंडिगेरी यांच्याकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ते अतिशय अनुभवी प्रशिक्षक असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाचा आम्हास फायदा मिळणार आहे. त्यांनी कसून सराव करून घेतला आहे. विशेषत: प्रत्येक खेळाडूची कामगिरी अष्टपैलू होईल यादृष्टीने त्यांनी सराव शिबिरात भर दिला आहे.
अभिलाषा म्हात्रे व किशोरी शिंदे यांचे संघात पुनरागमन झाले आहे. त्याचा फायदा कसा मिळेल?
अभिलाषा व किशोरी या दोन्ही खेळाडू यापूर्वी रेल्वेकडून खेळत होत्या. त्या आता आमच्याकडून खेळणार आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा लाभ आम्हाला होणार आहे. अभिलाषा ही खोलवर चढाया करण्यात निष्णात आहे. किशोरी ही अष्टपैलू खेळाडू आहे. या दोघी माझ्यापेक्षा अनुभवी असल्यामुळे वेळोवेळी त्यांच्याकडून मला बहुमोल मार्गदर्शन मिळत असते. किशोरी ही माझी बहीण आहे आणि तिच्याकडूनच मला कबड्डीसाठी प्रेरणा व खेळाचे बाळकडू लाभले आहे.
यंदा महाराष्ट्रापुढे प्रामुख्याने कोणत्या संघांचे आव्हान असणार आहे?
प्रामुख्याने आम्हाला रेल्वे संघाचे आव्हान असणार आहे. अभिलाषा व किशोरी यांना रेल्वेच्या खेळाडूंचे बारकावे माहीत असल्यामुळे त्यादृष्टीने आम्ही व्यूहरचना करणार आहोत. रेल्वेच्या खेळाडूंच्या कमकुवतपणाचा फायदा घेण्याचा आमचा प्रयत्न राहील. हिमाचल प्रदेश व हरयाणा हे संघही चांगल्या दर्जाचे आहेत. त्यांचा भर ताकदीच्या खेळावर असतो. कौशल्यपूर्ण खेळात हे खेळाडू कमी पडतात. आमचा भर प्रामुख्याने कौशल्यपूर्ण खेळावर राहणार आहे.
मॅटवर राष्ट्रीय स्पर्धा होणार असल्यामुळे त्यासाठी वेगळी काही तयारी केली आहे काय?
मॅटवर खेळताना जास्त दमछाक होते. तसेच दुखापतींचे प्रमाण अधिक असते. अचानक पाय मुरगळण्याची शक्यता असते. सराव शिबिरात शारीरिक क्षमता व तंदुरुस्ती यावर भर देण्यात आला आहे. आम्ही मॅटवर धावण्याचा दररोज सराव केला आहे.
आजपर्यंतच्या यशस्वी कारकिर्दीचे श्रेय तू कोणाला देशील?
माझे वडील प्रदीप हे स्वत: अव्वल दर्जाचे बॉक्सर असल्यामुळे त्यांचे व आई सुरेखा यांनी मला या खेळात कारकीर्द करण्यासाठी सतत प्रोत्साहन दिले आहे. तसेच आमच्या राजमाता जिजाऊ संघाचे प्रशिक्षक राजेंद्र ढमढेरे यांनी मला अतिशय बहुमोल मार्गदर्शन लाभले
आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jan 2014 रोजी प्रकाशित
महाराष्ट्राला विजेतेपद मिळवून देईन
वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत अनेक वेळा महाराष्ट्राला विजेतेपदाने हुलकावणी दिली आहे. अजिंक्यपद मिळविण्याच्या दृष्टीने कसून सराव केला
First published on: 20-01-2014 at 03:27 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kabaddi player snehal shinde