सलग किती सामन्यांत विजय मिळवल्यानंतर कोरियाविरुद्ध भारताचा पराभव झाला? सर्वाधिक गुणसंख्येचा सांघिक विक्रम कोणत्या देशाच्या नावावर आहे? एका चढाईत सर्वाधिक खेळाडू बाद करण्याचा विश्वविक्रम कोणी केला आहे? सामन्यात चढाई किंवा पकडींचे सर्वाधिक गुण कोणी मिळवले आहेत? हे सारे विक्रम कोणत्या तारखेला झाले आहेत? अशा असंख्य आकडय़ांची माहिती क्रीडारसिकांमध्ये उत्कंठा निर्माण करते. ही आकडेवारी सात आशियाई क्रीडा स्पर्धा आणि चार विश्वचषक कबड्डी स्पधार्र्चे संयोजन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाकडे उपलब्ध नाही.
कोणत्याही खेळातील आकडेवारी त्यामधील रंजकता वाढवते. क्रिकेटच्या यशात या आकडेवारीचा वाटा मोठा आहे. अनेक मंडळींना क्रिकेटचे विक्रम तोंडपाठ असतात, कारण क्रिकेटमध्ये ही सारी माहिती योग्य रीतीने उपलब्ध आहे. राष्ट्रीय स्तरावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद हे कार्य इमानेइतबारे करीत आहेत. याशिवाय क्रिकेटला वाहिलेली असंख्य संकेतस्थळे ही सर्व आकडेवारी सहजपणे उपलब्ध करतात. कबड्डीच्या बाबतीत या दृष्टीने कोणतेही पाऊल आतापर्यंत टाकण्यात आले नसल्याची खंत जाणकार क्रीडारसिक व्यक्त करतात.
१९९०मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने कबड्डीतील आंतरराष्ट्रीय पर्वाला प्रारंभ झाला. त्यानंतर आतापर्यंत पुरुषांच्या सात आशियाई क्रीडा स्पर्धा झाल्या. २०१०पासून महिलांच्या दोन आशियाई क्रीडा स्पर्धा झाल्या. याचप्रमाणे २००४ आणि २००७ मध्ये पुरुषांसाठी दोन विश्वचषक स्पर्धा झाल्या, तर २०१२मध्ये महिलांची विश्वचषक स्पर्धा झाली. आता अहमदाबादमध्ये तिसरी विश्वचषक कबड्डी स्पर्धा चालू असतानाही कबड्डीतील आकडेवारी योग्य पद्धतीने कार्यरत करण्याबद्दल कबड्डी संघटकांमध्ये मात्र उदासीनता आहे.
याबाबत आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवराज चतुर्वेदी म्हणाले की, ‘‘पहिल्या दोन विश्वचषक कबड्डी स्पर्धानंतर तब्बल नऊ वर्षांनी तिसरा विश्वचषक प्रक्षेपणमूल्य जपून होत आहे. या स्पध्रेने कबड्डीचे स्वरूपच पुरते पालटले आहे. यातूनच प्रेरणा घेत पुढील विश्वचषकापर्यंत आम्ही कबड्डीतील आकडेवारी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील राहू.’’
आकडेवारीचे गांभीर्य कबड्डी संघटनेला जरी नसले तरी प्रक्षेपणकर्त्यां स्टार स्पोर्ट्स वाहिनीला वेळीच लक्षात आले. त्यामुळे तिसऱ्या विश्वचषकाचा टीव्हीवर आनंद लुटणाऱ्या क्रीडारसिकांना किमान आकडेवारी ही वाहिनी उपलब्ध करते. तसेच मशाल स्पोर्ट्सच्या प्रयत्नांमुळे प्रो कबड्डी लीगचे आतापर्यंत चार हंगाम झाले आहेत. त्यांना सर्व आकडेवारी देण्याचे कार्य ‘स्पोर्ट्झइंटरअॅक्टिव्ह डॉट नेट’ करीत आहे. त्यामुळे खेळाडूच्या कामगिरीची अचूकता प्रो कबड्डी लीग व तिसऱ्या विश्वचषक कबड्डीमुळे सहजपणे अधोरेखित होते. मात्र आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय संघटनेकडून या दृष्टीने प्रयत्न झाल्यास या खेळामधील रंजकता वाढेल. म्हणूनच आतापर्यंत झालेल्या आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धा आणि खेळाडूंच्या कामगिरीची माहिती नोंदवण्याची गरज आहे.
त्रोटक गुणपत्रिका अडचणीच्या
राष्ट्रीय, राज्य किंवा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धाच्या गुणपत्रिकासुद्धा खेळाडूंच्या कामगिरीवर प्रकाशझोत टाकण्यात अपयशी ठरतात, कारण त्या अतिशय त्रोटक असतात. मध्यंतरी काही सॉफ्टवेअर कंपन्यांनी काही संगणकीय प्रयोगसुद्धा केले, मात्र खर्चीक असल्यामुळे ते फार काळ टिकले नाही. परंतु मुंबईतील कबड्डीतज्ज्ञ शशिकांत राऊत यांनी चढाईपटू आणि पकडपटू यांच्या कामगिरीचे मोजमाप करू शकणारी गुणपत्रिका तयार केली आहे. मात्र ती स्वीकारण्याचे धारिष्टय़ कोणत्याही संघटना दाखवत नाहीत. त्यामुळे क्रिकेटप्रमाणे कबड्डीतील निवडप्रक्रिया आकडेवारीचे मापदंड लावून निर्दोष ठरत नाही. राऊत यांच्याकडेच महाराष्ट्रात झालेल्या पुरुषांच्या दोन विश्वचषक स्पर्धाची आकडेवारी उपलब्ध आहे.