गतवर्षी मार्च महिन्यात भारतीय महिला कबड्डी संघाने विश्वचषक जिंकण्याची किमया साधली. या यशानंतर दीपिका जोसेफ, सुवर्णा बारटक्के आणि अभिलाषा म्हात्रे या तीन खेळाडूंना एक कोटी आणि प्रशिक्षक रमेश भेंडिगिरी यांना २५ लाख रुपयांचे बक्षीस महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते. पण आता दहा महिने झाले तरी या खेळाडूंना हे इनाम मिळालेले नाही.
जून महिन्यात मंत्रालयाला आग लागली, त्या आगीत अनेक महत्त्वाच्या फायली आणि कागदपत्रांचेही नुकसान झाले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी कबड्डीपटूंना इनाम देण्यासंदर्भातील फाइली त्या आगीत जळाल्याचे सांगितले होते.
नोव्हेंबरच्या उत्तरार्धात सांगलीत झालेल्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पध्रेच्या पारितोषिक वितरण समारंभाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. त्यावेळी समस्त कबड्डीरसिकांच्या साक्षीने मुख्यमंत्र्यांनी कबड्डीपटूंना आठ दिवसांत बक्षिसी देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. पण आता दोन महिने होत आले तरी ही दिरंगाईत संपत नाही. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मंत्रालयातील वित्त विभागाकडे या धनादेशासंदर्भात प्रक्रिया सुरू आहे. लवकरच ते समारंभपूर्वक विश्वविजेत्यांना देण्यात येईल.
१९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या निमित्ताने शासनाच्या राज्य पुरस्कारांचे वितरण करावे, असे नियमावलीत संकेत आहेत. याच कार्यक्रमात या विश्वविजेत्या खेळाडूंना आणि प्रशिक्षकाला सन्मानित करता येऊ शकते. अन्यथा फेब्रुवारी महिन्यात कोल्हापूरला महाराष्ट्र शासनाची छत्रपती शिवाजी करंडक कबड्डी स्पर्धा होणार आहे.
या निमित्ताने विश्वविजेत्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करावे, अशी क्रीडा क्षेत्रातून मागणी होत आहे.