वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आता अखेरच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिका वि. ऑस्ट्रेलिया या दोन्ही मोठ्या संघांमध्ये अटीतटीची लढत सुरू आहे. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २०७ धावा करत पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २८२ धावांचे लक्ष्य दिले. आफ्रिकेकडून धावांचा पाठलाग करताना एडन मारक्रमचे शतक आणि कर्णधार तेंबा बावूमाच्या अर्धशतकाच्या जोरावर संघाने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत २१३ धावा केल्या आहेत. यासह आफ्रिकेला विजयासाठी आता ६९ धावांची गरज आहे.

लॉर्ड्सवर खेळवल्या जात असलेल्या या अंतिम सामन्यातील पहिल्या डावात वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने ५ विकेट्स घेत मोठी कामगिरी केली. पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात चार विकेट घेतल्यानंतर आता सगळीकडे रबाडाच्या गोलंदाजीची चर्चा आहे. परंतु याशिवाय, त्याला एक सन्मान मिळाला जो लॉर्ड्सच्या मैदानावर कसोटी क्रिकेटच्या जवळजवळ १४१ वर्षांच्या इतिहासात फक्त वेस्ट इंडिजचे माजी सलामीवीर गॉर्डन ग्रीनिज यांना मिळाला होता.

लॉर्ड्सच्या मैदानावर शतक करणाऱ्या किंवा पाच विकेट घेणाऱ्या खेळाडूचे नाव सन्मान फलकावर सुवर्णाक्षरांनी लिहिले जाते. अलीकडेपर्यंत हा सन्मान मिळवणारे ग्रीनिज हे पहिले आणि एकमेव खेळाडू होते. आता हा सन्मान कगिसो रबाडाने देखील मिळवला आहे.

WTC फायनलच्या पहिल्या दिवसापूर्वी, लॉर्ड्सवरील १४१ वर्षांच्या कसोटी इतिहासात गॉर्डन ग्रिनीज असे एकमेव खेळाडू होते. ज्यांचे नाव होम ड्रेसिंग रूम (इंग्लंड संघाचा किंवा होम टीमचा दर्जा प्राप्त झालेल्या कोणत्याही संघाचा ड्रेसिंग रूम) आणि अवे ड्रेसिंग रूम (विदेशी संघाचा ड्रेसिंग रूम) या दोन्ही ऑनर्स बोर्डवर लिहिले होते. १९८४ मध्ये इंग्लंडविरुद्ध नाबाद २१४ धावा आणि त्यानंतर १९८८ मध्ये १०३ धावांच्या खेळीमुळे ग्रीनिज यांचे नाव ‘अवे ड्रेसिंग रूम’मध्ये सन्मान फलकावर सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले.

यानंतर १९८७ मध्ये मेरीलेबोन क्रिकेट क्लब (एमसीसी) कडून खेळताना रेस्ट ऑफ द वर्ल्ड इलेव्हन विरुद्ध त्यांनी केलेल्या १२२ धावांच्या खेळीमुळे त्यांचे नाव होम ड्रेसिंग रूममधील सन्मान फलकावर कोरले गेले.

आता WTC फायनलमध्ये उस्मान ख्वाजा, कॅमेरून ग्रीन आणि ब्यू वेबस्टरसह ५ विकेट्स घेतल्यानंतर रबाडाचे नाव ऑनर्स बोर्डवर लिहिले गेले आहे. दक्षिण आफ्रिकेला WTC फायनलसाठी लॉर्ड्सवर ‘होम ड्रेसिंग रूम’ देण्यात आला होता. तर पहिल्या डावात रबाडाने घेतलेल्या ५ विकेट्समुळे तो गॉर्डन ग्रीनिज यांच्या या क्लबमध्ये सामील झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी, २०२२ मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध कागिसो रबाडाने ५२ धावांत ५ विकेट घेतले होते. या कामगिरीमुळे त्याचे नाव अवे ड्रेसिंग रूमच्या (विदेशी संघाच्या ड्रेसिंग रूम) सन्मान बोर्डवर लिहिले होत. परंतु आता रबाडाने लॉर्ड्सवर आणखी एकदा पच विकेट्स मिळवत १४१ वर्षांच्या इतिहासात या दोन्ही बोर्डवर आपलं नाव असणारा दुसरा खेळाडू ठरला.