ब्राझीलचा मधल्या फळीतील फुटबॉलपटू काका रिअल माद्रिदकडून एसी मिलान संघात परतला आहे. रिअल माद्रिद आणि एसी मिलान यांच्यात करार झाला असून काका याला दोन वर्षांसाठी एसी मिलानने करारबद्ध केले. ‘काकाला एसी मिलानकडे आणण्यासाठीच्या वाटाघाटी संपल्या,’ असे मिलानचे व्यवस्थापकीय संचालक अ‍ॅड्रियानो गलिआनी यांनी क्लबच्या संकेतस्थळावर म्हटले आहे. ३१ वर्षीय काकाला ‘ट्रान्सफर विंडो’द्वारे ६५ दशलक्ष युरो देऊन एसी मिलानने संघात बोलावले. याच किमतीला रिअल माद्रिदने २००९मध्ये काकाला करारबद्ध केले होते. मात्र काकाच्या मानधनात मात्र घसरण झाली आहे. रिअल माद्रिद त्याला एका वर्षांला १० दशलक्ष युरो डॉलर मानधन देत होती, पण आता त्याला एसी मिलानकडून वर्षांला चार दशलक्ष युरो मिळणार आहेत. ‘‘मी पुन्हा घरी परतलो आहे. बोलणी बराच वेळ लांबली तरी मी आनंदी आहे. मला पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांचा तसेच सहकाऱ्यांचा मी ऋणी आहे,’’ असे काकाने सांगितले. पुढील वर्षी मायदेशात होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी ब्राझील संघात आपले स्थान निश्चित करण्यासाठी काकाने काही आठवडय़ांपूर्वी रिअल माद्रिद क्लब सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती.