गतविजेता मॅग्नस कार्लसन हा जगज्जेतेपदाबाबत अनुभवी असला तरी त्याचा प्रतिस्पर्धी सर्जी कर्याकिन हा देखील चांगल्या तयारीचाच खेळाडू आहे, याचाच प्रत्यय या दोन खेळाडूंमध्ये सुरू असलेल्या विश्व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेच्या अकराव्या डावात पाहावयास मिळाले. हा डाव बरोबरीत सुटल्यामुळे दोन्ही खेळाडूंचे प्रत्येकी साडेपाच गुण झाले आहेत. साहजिकच सोमवारी होणाऱ्या बाराव्या डावाबाबत कमालीची उत्कंठा निर्माण झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

[jwplayer uKgm2S1B]

या लढतीमधील दहाव्या डावात पांढऱ्या मोहरांच्या साहाय्याने खेळताना फायदा घेत कार्लसन याने विजय मिळविला व ५-५ अशी बरोबरी केली होती. बारा डावांच्या या लढतीमधील अंतिम डाव सोमवारी होणार आहे. या डावातही कार्लसन याला पांढऱ्या मोहरांनी खेळण्याचा लाभ मिळणार आहे. हा डाव बरोबरीत सुटला तर टायब्रेकर डावांचा उपयोग करण्यात येईल. हे डाव बुधवारी खेळविले जातील.

कर्याकिन याला अकराव्या डावात पांढऱ्या मोहरांनी खेळण्याचा अपेक्षेइतका लाभ घेता आला नाही. त्याने राजाच्या पुढील प्याद्याने सुरुवात केली. त्याने या लढतीमधील अगोदरच्या तीन डावांमध्ये तशीच सुरुवात केली होती. कार्लसनसाठी ही नवीन सुरुवात नव्हती. कर्याकिन याने चौथ्या चालीस कॅसिलग केले, तर कार्लसन याने आठव्या चालीस कॅसलिंग करीत राजा सुरक्षित केला. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी आक्रमणासाठी चांगली व्यूहरचना करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी एकमेकांचे दोन्ही घोडे तसेच पांढऱ्या घरातील उंटही घेतला.

कर्याकिन याने राजाच्या बाजूने आक्रमणासाठी प्रयत्न केले. त्या वेळी कार्लसन याने वजिराच्या बाजूने प्रत्युत्तर देण्यावर भर दिला. कर्याकिन याला अपेक्षेइतके खेळावर नियंत्रण मिळविता आले नाही. सतराव्या चालीस दोन्ही खेळाडूंकडे वजिर, दोन हत्ती, एक उंट तसेच आठही प्यादी अशी स्थिती होती. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी एकमेकांचा दुसरा उंट व एक हत्ती घेतला. कार्लसन याने आपले प्यादे शेवटच्या घरापर्यंत नेण्याचा प्रयत्न करीत कर्याकिन याच्यावर दडपण आणले. तथापि, कर्याकिन हा बचाव तंत्राबाबत माहीर असल्यामुळे त्याने कार्लसन याच्या राजास शह देण्यावर भर दिला. हा शह वाचवायचा तर शेवटून दुसऱ्या घरात गेलेले प्यादे गमवावे लागणार व पुन्हा डावात समान स्थिती होणार असे लक्षात येताच कार्लसन याने बरोबरी स्वीकारली. कर्याकिन याची दोन प्यादी एकाच रांगेत असल्यामुळे कर्याकिन याला त्याचा फायदा मिळणार नव्हता. त्यामुळेच त्याने बरोबरीचा प्रस्ताव तत्परतेने मान्य केला.

[jwplayer UyWFIua2]

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karjakin carlsen game 11 ends in draw in tight world chess championship battle
First published on: 28-11-2016 at 00:39 IST