India vs England 4th Test: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. मालकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवून दमदार कमबॅक केलं. मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारताला विजयाची संधी होती. पण हा सामना भारतीय संघाला २२ धावांनी गमवावा लागला. त्यामुळे भारतीय संघ या मालिकेत २- १ ने पिछाडीवर आहे. दरम्यान या तिन्ही सामन्यांमध्ये करुण नायरला प्लेइंग ११ मध्ये संधी दिली गेली आहे. मात्र, या तिन्ही सामन्यांमध्ये तो मोठी खेळी करू शकलेला नाही.
करुण नायर २०१७ मध्ये आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. त्यानंतर ८ वर्ष त्याला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नव्हती. या दौऱ्यासाठी त्याची निवड करण्यात आली. त्याला तिन्ही सामन्यांमध्ये चांगली सुरूवात मिळाली. पण या सुरुवातीचं रूपांतर तो मोठ्या खेळीत करू शकलेला नाही.
लॉर्ड्स कसोटीतील दुसऱ्या डावात त्याने फलंदाजीत योगदान देणं अपेक्षित होतं. पण ब्रायडन कार्सच्या गोलंदाजीवर तो ज्या पद्धतीने बाद झाला, त्यावरून त्याच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आता करुण नायरला प्लेइंग ११ मधून बाहेर बसवण्याची वेळ आली आहे, असं दिप दासगुप्ता यांचं म्हणणं आहे. त्याच्याऐवजी साई सुदर्शनला संधी मिळायला हवी, असं त्यांनी म्हटलं आहे.
या दौऱ्यावरील पहिल्याच सामन्यात साई सुदर्शनला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. मात्र त्याला पदार्पणात आपली छाप सोडता आली नव्हती. त्यामुळे त्याला प्लेइंग ११ मधून बाहेर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
दीप दासगुप्ता म्हणाले, “प्लेइंग ११ मध्ये तुम्हाला एकापेक्षा जास्त बदल करण्याची गरज नाही. जर एकच बदल हवा असेल तर तो करुण नायरच्या जागी साई सुदर्शनला संधी द्या. कारण करुण नायर हवी तशी कामगिरी करू शकलेला नाही. त्याला चांगली सुरूवात मिळत आहे, पण त्या खेळीचं रूपांतर तो मोठ्या खेळीत करू शकलेला नाही.” त्यामुळे चौथ्या कसोटीत भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये बदल होणार, हे निश्चित आहे.