Karun Nair on Team India Snub: रणजी ट्रॉफी स्पर्धेत करूण नायरने दुसऱ्या सामन्यात शतक झळकावत शानदार खेळी केली. करूणने कर्नाटककडून खेळताना १७४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. सातत्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावा करणाऱ्या करूण नायरला इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळालं होतं. पण यानंतर मात्र त्याला भारताच्या कसोटी संघातून वगळण्यात आलं. यावर त्याने मोठं वक्तव्य केलं आहे.
कसोटी संघातून वगळल्यानंतर करुण नायरने मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत नायरने आठ वर्षांनी भारतीय कसोटी संघात पुनरागमन केलं होतं, पण त्याची कामगिरी अपेक्षेनुसार नव्हती. यामुळे त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आलं.
करूणने कारकिर्दीतील २५ वे प्रथम श्रेणी शतक झळकावल्यानंतर म्हणाला, ‘गेल्या दोन वर्षातील माझ्या कामगिरीकडे पाहता, मला वाटतं की मला अधिक संधी मिळायला हव्या होत्या. मला एका मालिकेपेक्षा अधिक मालिका खेळण्याच्या संधी मिळायला हव्या होत्या. लोकांचं स्वतःचं मत असू शकतं, परंतु वैयक्तिकरित्या, मला वाटतं की मी त्याहूनही अधिक संधी मिळवण्यासाठी पात्र होतो.”
“माझं स्वप्न माझ्या देशासाठी खेळणं आहे. जर तेच होत नसेल, तर माझं पुढचं ध्येय मी ज्या संघासाठी खेळत आहे, त्या संघाला जिंकण्यास मदत करणं आहे,” असं पुढे नायर म्हणाला.
मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून नायरला वगळण्याचे कारण सांगितले होते. “इंग्लंडमध्ये आम्हाला त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. चार कसोटी सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधून फक्त एक अर्धशतक पुरेसे नव्हतं,” असं आगरकर म्हणाले होते.
जूनमध्ये शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत नायरने चार सामने खेळले. या ३३ वर्षीय खेळाडूने आठ डावांमध्ये फक्त २०५ धावा केल्या, ज्यामध्ये फक्त एक अर्धशतकाचा समावेश होता. ही मालिका २-२ अशी बरोबरीत राहिली.
दुखापतीमुळे काही काळ संघाबाहेर राहिल्यानंतर, नायरची दुलीप ट्रॉफी आणि ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध भारत अ संघाच्या मालिकेसाठी निवड झाली नाही. यानंतर त्याने कर्नाटकसाठी रणजी ट्रॉफीमध्ये शानदार पुनरागमन केलं. पहिल्या फेरीत ७३ आणि ८ धावा केल्यानंतर, नायरने दुसऱ्या फेरीत गोवाविरुद्ध नाबाद १७४ धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे कर्नाटकने ३७१ धावा केल्या.
