केरळ ब्लास्टर आणि अ‍ॅटलेटिको डी कोलकाता आज समोरासमोर

‘केरळा ब्लास्टरच्या घरी आपले स्वागत’.. कोची आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर पडताच आपल्या डोळ्यांना दिसणारे हे पहिले वाक्य. कोची येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर विशिष्ट अंतरावर असे बरेचसे फलक दिसतात. केरळ या फुटबॉलवेडय़ा राज्यात इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) प्रत्येक सामन्याला ५० ते ६० हजार प्रेक्षकांची उपस्थिती होती. प्रेक्षकांच्या प्रेमातून मिळालेल्या ऊर्जेमुळे केरळा ब्लास्टरने आयएसएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आणि हीच शक्ती त्यांना माजी विजेत्या अ‍ॅटलेटिको डी कोलकाताला नमवण्याची ताकद देत आहे.

रविवारी जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणाऱ्या तिसऱ्या हंगामाच्या अंतिम लढतीत दोन्ही क्लब इतिहास नोंदवण्यासाठी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. कोलकाताला दुसऱ्या जेतेपदाची आस असली तरी केरळ पहिल्यांदा विजयी चषक उंचावून प्रेक्षकांचे ऋण फेडण्यासाठी सज्ज आहे.

आयएसएलच्या पहिल्या हंगामात कोलकाता आणि केरळ यांच्यात जेतेपदाची लढत झाली होती आणि त्यात कोलकाताने बाजी मारून पहिल्या जेतेपदाचा मान पटकावला होता. त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी केरळला मिळाली आहे. घरच्या मैदानावरील केरळने सलग सहा सामन्यांत अपराजित राहण्याचा पराक्रम केला आहे. पण याच मैदानावर साखळी फेरीच्या पहिल्या लढतीत कोलकाताने यजमानांना नमवण्याची किमया केली आहे. त्यामुळे या सामन्याचे पारडे दोलायमान आहे. अंतिम सामन्यात सर्वोत्तम खेळ करणाऱ्या संघाच्या बाजूने जेतेपदाचे पारडे झुकेल हे निश्चित. उपांत्य फेरीत केरळला विजयासाठी संघर्ष करावा लागला होता, तर कोलकाताने विजयी संघातील नऊ प्रमुख खेळाडूंना विश्रांती देत दुसऱ्या फळीतील खेळाडूंसह अंतिम फेरीत सहज प्रवेश केला. त्यामुळे पुरेशा विश्रांतीमुळे ताजेतवाने झालेले कोलकाताचे प्रमुख खेळाडू यजमानांसाठी डोकेदुखी ठरू शकतात. इयान ह्युम हा पूर्वाश्रमीचा केरळ संघाचा सदस्य असल्यामुळे मोठय़ा संख्येत त्याचा चाहता वर्ग आहे आणि कोलकाताच्या बाजूने तो उभा राहू शकतो. कोलकातानेही मागील आठ सामन्यांत एकही लढत गमावलेली नाही. त्यामुळे जेतेपद कोण जिंकणार, याची उत्सुकता सर्वाना लागली आहे.

  बचाव विरुद्ध आक्रमण

केरळचा बचाव विरुद्ध कोलकाताचा आक्रमण, अशी लढत या लढतीत पाहायला मिळेल. अ‍ॅरोन, क्रेडीक हेंगबर्ट, रिनो अँटो, संदेश झिंगन या बचावपटूंनी प्रतिस्पर्धी संघाचे आक्रमण अचूकपणे थोपवून केरळला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. त्यांना गोलरक्षक संदीप नंदीनेही उल्लेखनीय साथ दिली आहे. दिल्ली डायनामोझ विरुद्ध पेनल्टी शूटआऊटमध्ये नंदीने अभेद्य भिंत उभी केली होती आणि त्याच जोरावर केरळने यजमानांना त्यांच्याच घरी लोळवले. दुसरीकडे कोलकाताची आक्रमणफळी ही स्पध्रेतील सर्वोत्तम आक्रमकांपैकी एक मानली जात आहे. हेल्डर पोस्टिगा, इयान हे माजी आंतरराष्ट्रीय आक्रमणपटू कोणतीही बचावफळी भेदण्यात सक्षम आहेत. मुंबई सिटी एफसीविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या लढतीत ज्युआन बेलेन्कोसोला लाल कार्ड दाखवण्यात आल्याने तो अंतिम लढतीला मुकणार आहे. त्यामुळे केरळाला किंचितसा दिलासा मिळाला आहे.

  • केरळ आणि कोलकाता आत्तापर्यंत ७ वेळा एकमेकांविरुद्ध खेळले असून त्यापैकी सर्वाधिक ४ विजय कोलकाताच्या नावावर आहेत. केरळला एकच विजय मिळवता आला आहे, तर दोन लढती अनिर्णीत सुटल्या.
  • आयएसएलच्या तिन्ही हंगामात सर्वाधिक २३ गोल नावावर असलेल्या इयान ह्य़ुमला केरळविरुद्ध एकही गोल करता आलेला नाही. त्याने मुंबईविरुद्ध ६ गोल केले आहेत. त्यापाठोपाठ चेन्नई व पुणे (प्रत्येकी ५), दिल्ली (३), कोलकाता (२) आणि गोवा व नॉर्थ ईस्ट (प्रत्येकी १) यांचा क्रमांक येतो.

सी. के. विनिथ विरुद्ध इयान ह्युम

बंगळुरू एफसी क्लबकडून खेळणाऱ्या आक्रमपणपटू सी. के. विनिथने आयएसएलमध्ये धडाक्यात सुरुवात करून केरळला जेतेपदाच्या उंबरठय़ावर आणले आहे. केरळकडून सर्वाधिक ५ गोल विनिथच्या नावावर असून अंतिम लढतीत त्याची आणि कोलकाताच्या ह्य़ुमची लढाई पाहण्यास सगळेच उत्सुक आहेत. पहिल्या सत्रात केरळकडून खेळणाऱ्या ह्य़ुमने दोन्ही हंगामात कोलकाताकडून सर्वोत्तम कामगिरी केली आहे. सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत  (७) दुसऱ्या क्रमांकावर आहे.

सौरभ विरुद्ध सचिन

आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खांद्याला खांदा लावून प्रतिस्पर्धी संघांची पळताभुई करून सोडणारे भारताचे दोन माजी क्रिकेटपटू या लढतीच्या निमित्ताने पुन्हा समोरासमोर आले आहेत. मात्र यंदा ते सोबत नसून एकमेकांविरुद्ध आले आहेत. सचिन तेंडुलकर हा केरळ ब्लास्टरचा, तर सौरभ गांगुली हा अ‍ॅटलेटिको डी कोलकाताचा सहमालक आहे आणि त्यामुळे अंतिम लढतीत ‘मास्टर’स्ट्रोक पाहायला मिळेल, की पुन्हा ‘दादा’गिरी चालेल, या चर्चाना उधाण आले आहे.

कोचीतील वातावरण आमच्यासाठी पोषक आहे. घरचे प्रेक्षक अंतिम लढतीत १२व्या खेळाडूची भूमिका पार पाडतील. तरीही सर्वोत्तम खेळ करूनच जेतेपद पटकावण्याचा आमचा निर्धार आहे. स्टीव्ह कोपेल, केरळ ब्लास्टरचे प्रशिक्षक

केरळला त्यांच्या घरी नमवणे आव्हानात्मक असले तरी आमच्याकडे चांगल्या खेळाडूंची फळी आहे. त्यामुळे कुठे खेळतो, याचा विचार करत नाही.  जोस मोलिना, अ‍ॅटलेटिको डी कोलकाताचे प्रशिक्षक

सामन्याची वेळ : सायंकाळी ७ वाजल्यापासून. थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.