वृत्तसंस्था, पंचकुला : ठाण्याच्या संयुक्ता काळेने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत तालबद्ध जिम्नॅस्टिक्समध्ये पाच सुवर्णपदकांची कमाई करत चमक दाखवली. या क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चुणूक दाखवताना आतापर्यंत एकूण २१ पदके (सहा सुवर्ण, सात रौप्य, आठ कांस्यपदके) जिंकली आहेत. महाराष्ट्राने मंगळवारी ११ सुवर्णपदकांसह एकूण २० पदके कमावली. याच बळावर महाराष्ट्राने (२४ सुवर्ण, २२ रौप्य, १७ कांस्यपदके) हरयाणाला मागे टाकत (२३सुवर्ण, २० रौप्य, २९ कांस्यपदके) पुन्हा गुणतालिकेत अग्रस्थान प्राप्त केले आहे.

१६ वर्षीय संयुक्ताने तालबद्ध जिम्नॅस्टिक्समध्ये समाविष्ट असलेल्या रोप, हूप, बॉल, क्लब्स आणि रिबन प्रकारात सर्वोत्तम कामगिरी केली. निष्का काळेनेही रौप्यपदक पटकावत राज्याच्या पदकतालिकेत भर घातली. अ‍ॅथलेटिक्समध्ये राज्याच्या खेळाडूंनी पदकांची लयलूट केली. उंच उडीत कोल्हापूरच्या अनिकेत मानेने (२.०७ मीटर) सुवर्णपदक पटकावले, तर रायगडच्या आर्यन पाटीलने (२.०४ मीटर) रौप्यपदक जिंकले. साताऱ्याच्या सुदेष्णा शिवणकरने १०० मीटर शर्यतीत सुवर्णकमाई केली, तर पुण्याच्या अवंतिका नरळेने रौप्यपदक मिळवले. ४ बाय १०० मीटर रीलेमध्ये दिग्विजय चौघुले, सार्थक शेलार, आर्यन कदम व आकाश सिंग या चौकडीने सुवर्णपदक जिंकले. प्रकारात महाराष्ट्राच्या मुलींच्या संघानेही सुवर्णपदक जिंकले. या संघात सुदेष्णा, साक्षी चव्हाण, अवंतिका, संजया सावंत यांचा समावेश होता.

सायकलिंगमध्ये केरीन प्रकारात मुलांमध्ये मंगेश ताकमोगेने आणि मुलींमध्ये पूजा दानोळेने रौप्यपदके पटकावली. कुस्तीमधील फ्रीस्टाईल प्रकारातील ५१ किलो वजनी गटात कोल्हापूरच्या नरसिंग पाटीलने सुवर्ण तर, रोहित पाटीलने रौप्यपदक मिळवले. मुलींच्या ४९ किलो वजनी गटात अहिल्या शिंदेने कांस्यपदक जिंकले, तर ६५ किलो वजनी गटात कोल्हापूरच्या शुभम पाटीलने सोनेरी कामगिरी केली. ७१ किलो गटात संकेत पाटीलने कांस्यपदक मिळवले. मुंबईच्या दर्शन पुजारीने तमिळनाडूच्या ऋत्विक संजीवला २१-१५, २२-२० असे सरळ दोन गेममध्ये पराभूत करत बॅडिमटनमध्ये सुवर्णपदक प्राप्त करीत लक्ष वेधले. कबड्डीत महाराष्ट्राच्या मुलींनी रूपेरी यश मिळवले. महाराष्ट्राने अंतिम सामन्यात हरयाणाला ४८-२९ असे नामोहरम केले. हरयाणाच्या खेळाडूंच्या आक्रमक चढायांसमोर महाराष्ट्राचे खेळाडू निरुत्तर झाले. महाराष्ट्राच्या हरजीत कौर, यशिका पुजारी आणि मनीषा राठोडने पराभव टाळण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले.