अखेरच्या दिवशी ३ सुवर्णपदकांसह ७ पदकांची कमाई; हरयाणा अव्वल
पंचकुला : महाराष्ट्राच्या दोन्ही खो-खो संघांनी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी सुवर्णपदके पटकावली. मात्र हरयाणाच्या बॉक्सिंगपटूंनी महाराष्ट्राच्या तुलनेत दर्जेदार कामगिरी केली. त्यामुळे स्पर्धेअंती महाराष्ट्राला पदकतालिकेत दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले, तर हरयाणाने बाजी मारली.
या स्पर्धेतील अग्रस्थानासाठी महाराष्ट्र आणि हरयाणा यांच्यात अखेरच्या दिवसापर्यंत चढाओढ सुरू होती. मात्र यजमान हरयाणाला अखेरीस वरचढ ठरण्यात यश आले. अंतिम पदकतालिकेत अग्रस्थान पटकावणाऱ्या हरयाणाच्या खात्यावर ५२ सुवर्ण, ३९ रौप्य आणि ४६ कांस्य अशी एकूण १३७ पदके होती. तर दुसऱ्या स्थानावरील महाराष्ट्राने ४५ सुवर्ण, ४० रौप्य आणि ४० कांस्यपदकांसह एकूण १२५ पदके पटकावली.

सोमवारी महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात ओडिशावर २१-२० असा निसटता विजय नोंदवत जेतेपद मिळवले. या सामन्यात महाराष्ट्राची कर्णधार जान्हवी पेठे (१:३५, २:२० मि. संरक्षण), प्रीती काळे (१:४५, २:४० मि. संरक्षण आणि २ बळी) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
मुलांच्या अंतिम सामन्यातही महाराष्ट्राने ओडिशाला १४-११ असे एक डाव आणि तीन गुणांच्या फरकाने नमवत सुवर्णपदक आपल्या नावे केले. या सामन्यात शुभम थोरात (२ मि. संरक्षण आणि २ बळी), नरेंद्र कातकडे (२ मि. संरक्षण आणि २ बळी) यांनी चमकदार कामगिरी केली.
बॉक्सिंगमध्ये महाराष्ट्राच्या सुरेश विश्वनाथने हरयाणाच्या आशीषचा ५-० असा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. मात्र व्हिक्टर सिंगला चंडीगडच्या अंकितकडून ०-४ असे पराभूत व्हावे लागले. विजय सिंगलाही आपल्या गटात पराभवाचा सामना करावा लागला. परिमाणी महाराष्ट्राला बॉिक्सगमध्ये एक सुवर्ण आणि तीन रौप्यपदके मिळाली. तसेच टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या दीपित पाटीलने कांस्यपदक कमावले.
