माजी राष्ट्रीय खो-खो पटू व प्रशिक्षक संजय मधुकर जोशी (वय ५४ वर्षे) यांचे हृदयविकाराने येथे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
संजय यांनी लहानपणापासून लंगडी व खो-खो या खेळात करिअर सुरू केले. नवमहाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी राज्य व अखिल भारतीय स्तरावरील अनेक स्पर्धामध्ये सवरेत्कृष्ट आक्रमक, संरक्षक व अष्टपैलू अशी पारितोषिके पटकाविली. चार वेळा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. त्यापैकी एका स्पर्धेत त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्वही केले. १९८३-८४ मध्ये राज्य शासनाने त्यांना शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानितही केले होते. खो-खो बरोबरच अ‍ॅथलेटिक्समध्येही त्यांनी अनेक स्पर्धामध्ये अव्वल यश मिळविले. महाराष्ट्र बँकेत नोकरी करताना त्यांनी आंतर बँक खो-खो स्पर्धा तसेच आंतर बँक मैदानी स्पर्धामध्ये कौतुकास्पद कामगिरी केली. राष्ट्रीय स्तरावरील खो-खो प्रशिक्षक व पंच म्हणूनही त्यांनी नावलौकिक मिळविला होता. माजी राष्ट्रीय खो-खो व अ‍ॅथलेट अभय जोशी हे त्यांचे धाकटे बंधू होत.