India vs England 4th Test: भारतीय संघातील टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी इंग्लंड दौऱ्यावर मन जिंकणारी कामगिरी केली आहे. ज्यात यशस्वी जैस्वाल , केएल राहुल आणि शुबमन गिल यांचा समावेश आहे. केएल राहुलने आपल्या अनुभवाचा चांगलाच फायदा घेतला आहे. या मालिकेत त्याने २ शतकं झळकावली आहेत. आता मँचेस्टर कसोटीत त्याच्याकडे आणखी एक शतक झळकावण्याची संधी आहे. या सामन्यातील चौथ्या दिवशी फलंदाजी करताना तो ८७ धावांवर नाबाद परतला आहे. त्यामुळे पाचव्या दिवशी तो शतक पूर्ण करू शकतो. यादरम्यान त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
भारतीय संघाचा सर्वात विश्वासू फलंदाज
भारतीय संघातील सलामीवीर फलंदाज केएल राहुलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९००० धावा पूर्ण केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना त्याने ३७४४ धावा केल्या आहेत. तर वनडे क्रिकेटमध्ये ३०४३ धावा केल्या आहेत. तर टी -२० क्रिकेटमध्ये त्याच्या नावे २२६५ धावा करण्याची नोंद आहे. मुख्य बाब म्हणजे केएल राहुल ज्यावेळी फलंदाजी करत होता त्यावेळी भारतीय संघाला सुरुवातीलाच २ मोठे धक्के बसले होते. यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन शून्यावर माघारी परतले होते. असं असतानाही त्याने शुबमन गिलसोबत मिळून डाव सावरला.
भारत – इंग्लंड कसोटी मालिकेत राहुलची दमदार कामगिरी
केएल राहुलने या मालिकेतील प्रत्येक सामन्यात दमदार कामगिरी केली आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने दमदार शतक झळकावलं होतं. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याने दमदार अर्धशतक झळकावलं. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात फलंदाजी करताना त्याने लॉर्ड्सच्या मैदानावर शतक झळकावलं. आता चौथ्या कसोटीतही त्याला शतक झळकावण्याची संधी आहे. त्यामुळे केएल राहुल भारतीय संघासाठी सर्वात विश्वासू फलंदाज ठरत आहे.
केएल राहुलकडे शतक झळकावण्याची संधी
या सामन्यातील दुसऱ्या डावात भारतीय संघ फलंदाजीला आला त्यावेळी पहिल्याच षटकात भारतीय संघाला २ मोठे धक्के बसले. यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन लागोपाठ २ चेंडूंवर बाद होऊन माघारी परतले. इंग्लंडने मोठी आघाडी घेतल्यानंतर केएल राहुलवर मैदानावर टिकून राहण्याची मोठी जबाबदारी होती. त्याने ही जबाबदारी शुबमन गिलसोबत मिळून पार पाडली. चौथ्या दिवशी तो ८७ धावांवर तो नाबाद परतला.