Moeen Ali: शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने इंग्लंडमध्ये दमदार कामगिरी केली. ५ कसोटी सामन्यांची मालिका २-२ ने बरोबरीत राहिली. ही मालिका बरोबरीत समाप्त होणं हे भारतीय संघापेक्षा मालिका जिंकण्यापेक्षा कमी नाही. कारण विराट कोहली, रोहित शर्मा आणि आर अश्विनसारख्या अनुभवी खेळाडूंनी कसोटी संघाची साथ सोडल्यानंतर संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी शुबमन गिलकडे सोपवण्यात आली होती. दरम्यान गिलने ही जबाबदारी योग्यरित्या पार पाडली आणि मालिका बरोबरीत आणली. भारताकडून फलंदाजी करताना कर्णधार शुबमन गिलने सर्वाधिक ७५४ धावा केल्या. तर जो रूटने ५३७, केएल राहुलने ५३२ धावा चोपून काढल्या. यादरम्यान त्याने ५३.२ च्या सरासरीने धावा करताना २ शतकं झळकावली. दरम्यान इंग्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू मोईन अलीच्या मते, केएल राहुल हा जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे.
मोईन अलीने ‘बर्ड बिफोर विकेट’या पॉडकास्टमध्ये बोलताना केएल राहुलचं तोंडभरून कौतुक केलं. मोईन अली म्हणाला, “केएल राहुल हा सलामीवीर फलंदाज म्हणून किती उत्तम फलंदाज आहे, हे अजूनही लोकांना कळालेलं नाही. गेल्या वेळी जेव्हा भारताचा संघ इंग्लंडमध्ये आला होता, त्यावेळी देखील त्याने दमदार कामगिरी केली होती. आता यावेळीही त्याने दमदार कामगिरी केली आहे. शुबमन गिलने या मालिकेत सर्वाधिक धावा केल्या, पण मला वाटतं केएल राहुलची भूमिका अतिशय महत्वाची होती. मी त्याला कित्येक वर्षांपासून खेळताना पाहतोय.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “मला तरी हेच वाटतं की तो सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे. मी हे आधीही सांगितलं आहे.” केएल राहुलने इंग्लंड दौऱ्यावर दमदार कामगिरी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या दौऱ्यावर त्याने ५०० पेक्षा अधिक धावा केल्या.तर गेल्यावेळी त्याने २०० हून अधिक धावा केल्या होत्या. यावेळी फलंदाजी करताना त्याने लीड्स आणि लॉर्ड्स कसोटीत दमदार शतकी खेळी केली होती. लॉर्ड्सच्या मैदानावर शतक झळकावताच त्याच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली. जो लॉर्ड्सच्या मैदानावर एकाहून अधिक शतकं झळकावणारा दुसराच भारतीय फलंदाज ठरला. याआधी दिलीप वेंगसरकरांनी हा कारनामा केला होता. याआधी २०२१ मध्येही त्याने लॉर्ड्सच्या मैदानावर शतक झळकावलं होतं.
या मालिकेत भारतीय संघाने दमदार कामगिरी केली. मालिकेतील पहिला सामना हेडिंग्लेमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर एजबस्टन कसोटीत भारतीय संघाने दमदार पुनरागमन केलं आणि विजय मिळवला. मालिका १-१ ने बरोबरीत आल्यानंतर तिसऱ्या कसोटीतही इंग्लंडने बाजी मारली. मालिकेतील चौथा कसोटी सामना ड्रॉ राहिला. तर मालिकेतील पाचवा सामना जिंकून भारतीय संघाने ही मालिका २-२ ने बरोबरीत आणली.