रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं विजेतेपद मुंबई इंडियन्सने पटकावलं. कर्णधार या नात्याने रोहित शर्माचं हे पाचवं विजेतेपद ठरलं. मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर भारतीय टी-२० संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवावं याबद्दल मागणी व्हायला लागली. अनेक माजी खेळाडूंनी जाहीरपणे रोहितने टी-२० संघाचं नेतृत्व करावं असं मत मांडलं. Star Sports वाहिनीवरील कार्यक्रमात बोलत असताना माजी खेळाडू गौतम गंभीर आणि आकाश चोप्रा यांच्यात दोन्ही विषयांवर बरीच मतमतांतर पहायला मिळाली.

“विराट कोहली हा वाईट कर्णधार नाही पण रोहित शर्मा चांगला कर्णधार आहे. त्यांच्या कर्णधारपदाच्या शैलीमध्ये मोठा फरक आहे.” Cricket Connected कार्यक्रमात बोलत असताना गंभीरने आपलं मत मांडलं. ज्याला प्रत्युत्तर देत असताना आकाश चोप्राने, आता बदल करुन नव्याने संघ निर्माण करण्याची वेळ नाही असं मत मांडलं. “नवीन विचार नक्कीच मांडले जावेत. परंतू पुढील वर्षांत टी-२० विश्वचषकाआधी काही सामने शिल्लक असताना कर्णधारपदात बदल करण्याच्या विरोधात मी आहे.”

आकाश चोप्राच्या या मताला प्रत्युत्तर देताना गौतम गंभीरने जर आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर खेळाडूंची भारतीय संघात निवड होत असेल तर कर्णधारराची निवडही त्याच निकषावर का करायची नाही?? असा सवाल विचारला…

दोन्ही बाबतीत निकष वेगवेगळे लावणं योग्य नाही, असं असेल तर आयपीएलच्या कामगिरीचा निकष लावलाच जाऊ नये असंही मत गंभीरने मांडलं. दरम्यान सध्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. २७ नोव्हेंबरपासून भारतीय संघाच्या दौऱ्याला सुरुवात होणार असून या मालिकेत दोन्ही संघ ३ वन-डे, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामने खेळणार आहे.