कोरिया ओपन सुपर सीरिजच्या उपांत्य फेरीत भारताच्या पी व्ही सिंधूने चीनच्या बिंगिजाओवर मात करत अंतिम फेरीत धडक दिली. सिंधूने बिंगिजाओवर २१-१०, १७-२१, २१-१६ ने मात केली. अंतिम फेरीत सिंधूसमोर जपानच्या नोझोमी ओकुहाराचे आव्हान असेल.
कोरिया ओपन सुपर सीरिजच्या उपांत्य फेरीत शनिवारी सिंधूचा सामना चीनच्या बिंगिजाओशी होता. सिंधूने पहिला सेट २१-१० ने जिंकला. हा सामना एकतर्फी होणार की काय असे चित्र दिसत होते. मात्र सहाव्या मानांकित बिंगिजाओने पुनरागमन करत दुसरा सेट २१-१७ ने जिंकला. तिसऱ्या सेटमध्येही बिंगिजाोने सिंधूला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. पण सिंधूच्या झंझावातासमोर ती अपयशी ठरली. सिंधूने सर्वोत्तम खेळी करत तिसरा सेट २१-१६ ने जिंकला.
फायनलमध्ये सिंधूसमोर जपानच्या नोझोमी ओकुहाराचे आव्हान आहे. दोन आठवड्यांपूर्वी जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत ओकुहाराने सिंधूचा २१-१९, २०-२२, २२-२० ने पराभव करत विजेतेपद पटकावले होते. आता कोरिया सुपर सीरिजमध्ये ओकुहारावर मात करुन जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढण्याची संधी सिंधूसमोर आहे.
Korea Open Super Series: India's PV Sindhu defeats China's He Bingjiao by 21-10, 17-21, 21-16 to enter into the final
— ANI (@ANI) September 16, 2017