मॉन्टे कार्लो : भारताच्या कुश मैनीने चमकदार कामगिरी करताना मोनॅको ग्रां. प्रि. फॉर्म्युला-२ स्प्रिंट शर्यतीचे जेतेपद मिळवले. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. भारतीय मोटरस्पोर्टमधील ही ऐतिहासिक कामगिरी म्हणावी लागेल. डॅमगस लुकास ऑईलसाठी चालकाची जबाबदारी पार पडणाऱ्या मैनीने संपूर्ण शर्यतीत छाप पाडत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
मैनीने ३० फेरींच्या (लॅप) या शर्यतीत दबावाखाली सुरेख कामगिरी करीत विजेतेपद मिळवले. विजेता ठरल्यामुळे मोनॅकोच्या रस्त्यांवर भारताचे राष्ट्रगीत दुमदुमले. मैनीने कनिष्ठ शर्यतींपासूनच जेके रेसिंग आणि टिव्हीएस रेसिंग यांनी पाठिंबा दिला आहे. मैनीने हंगामातील पहिल्याच फॉर्म्युला-२ स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.
‘‘मोनॅकोमध्ये विजय मिळवणारा मी भारतीय ठरलो. हे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे. मला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे यावेळी मी आभार मानू इच्छितो,’’ असे जेतेपद मिळवल्यानंतर मैनी म्हणाला. पुढील आठवड्यात मैनी बार्सिलोना ग्रां. प्रि. शर्यतीत सहभागी होईल. हंगामाची चांगली सुरुवात झाली नसतानाही मोनॅको ग्रां. प्रि. विजेतेपदानंतर मैनीला आगामी शर्यतींसाठी आत्मविश्वास दुणावेल.