सध्याच्या अमेरिकन खुल्या स्पर्धेत एकामागून एक नामांकित खेळाडूंना पराभवाचे धक्के बसण्याचा सिलसिला अजूनही सुरुच असून महिलांमध्ये विम्बल्डनविजेती पेत्रा क्विटोवाला पराभवाचा धक्का बसला आहे. पण पुरुषांच्या एकेरीत माजी विजेता नोव्हाक जोकोव्हिच व अँडी मरे या अनुभवी खेळाडूंनी विजयासह आव्हान कायम राखले.
तृतीय मानांकित क्विटोवाला जागतिक क्रमवारीत १४५व्या स्थानावर असलेल्या अॅलेक्झांड्रा क्रुनिक या २१ वर्षीय खेळाडूने ६-४, ६-४ असे पराभूत केले. महिला गटात पहिल्या दहा मानांकित खेळाडूंपैकी पाच खेळाडूंना आतापर्यंत घरचा रस्ता पकडावा लागला आहे. याआधी द्वितीय मानांकित सिमोना हॅलेप, चौथी मानांकित अॅग्निझेका राडवानस्का, सहावी मानांकित अँजेलिक केर्बर, आठवी मानांकित अॅना इव्हानोविक यांना अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
पुरुष गटात २०११चा विजेता खेळाडू जोकोव्हिचने अमेरिकन खेळाडू सॅम क्युऐरी याच्यावर ६-३, ६-२, ६-२ असा दणदणीत विजय मिळविला. जोकोव्हिचने सॅमवर आठव्यांदा मात केली आहे.
२०१२ मध्ये अजिंक्यपद मिळविणाऱ्या मरेला रशियाच्या आंद्रे कुझ्नेत्सोव याच्याविरुद्ध विजय मिळविताना झगडावे लागले. त्याने हा सामना ६-१, ७-५, ४-६, ६-२ असा जिंकला. त्याने सातव्यांदा या स्पर्धेच्या चौथ्या फेरीत स्थान मिळविले आहे.
मिलोस राओनिक या कॅनेडियन खेळाडूनेही चौथी फेरी गाठली. पाचव्या मानांकित राओनिकने डॉमिनिक प्रजासत्ताक देशाचा ३४ वर्षीय खेळाडू व्हिक्टर बुगरेसवर ७-६ (७-५), ७-६ (७-५), ७-६
(७-३) असा संघर्षपूर्ण विजय मिळविला.