पीटीआय, हाँगकाँग

सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही पुरुष दुहेरी जोडी, तसेच एकेरीत लक्ष्य सेन हाँगकाँग बॅडमिंटन स्पर्धेत (सुपर ५०० दर्जा) उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

लक्ष्यचा जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असणाऱ्या ली शी फेंगपुढे निभाव लागला नाही. पुरुष एकेरीच्या एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात लक्ष्यला १५-२१, १२-२१ अशा पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे, गेल्या महिन्यात जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या सात्त्विक-चिराग जोडीला पहिला गेममधील आघाडीनंतरही ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या लियांग वेई केंग आणि वँग चँग या चीनच्या जोडीकडून २१-१९, १४-२१, १७-२१ असा पराभव पत्करावा लागला.

लक्ष्यने पहिल्या गेममध्ये सुरुवातीला ४-० अशी आघाडी घेतली. यानंतर लीने ८-८ अशी बरोबरी साधली, मग वेगवान स्मॅश लगावत सलग गुणांची कमाई करताना १४-१० अशी आघाडी मिळवली. लक्ष्यने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, निर्णायक क्षणी त्याच्याकडून चुका झाल्या आणि लीने पहिला गेम २१-१५ असा जिंकत आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्येही लक्ष्यने ४-१ अशी आघाडी घेतली. मात्र, चांगल्या रॅली करीत ली याने पुनरागमन केले. एकवेळ लक्ष्य ९-१२ असा पिछाडीवर होता. लीने आपली आघाडी वाढवत १५-९ अशी केली. यानंतर त्याने आठ मॅच पॉइंट मिळवत गेमसह जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात दोन्ही जोड्यांमध्ये चांगली चुरस पाहायला मिळेल. पहिल्या गेममध्ये मध्यंतरापर्यंत सात्त्विक-चिराग जोडीकडे ११-१० अशी आघाडी होती. चीनच्या जोडीने आपला खेळ उंचावत गुणांची कमाई केली व गेममध्ये १८-१७ अशी आघाडी घेतली. सात्त्विकने यानंतर स्मॅशच्या मदतीने १९-१९ अशी बरोबरी साधली. यानंतर लियांगचा फटका बाहेर गेल्याने भारताला गुण मिळाला. मग, चिरागने चांगली ‘सर्व्हिस’ करत गेम जिंकला. चीनच्या जोडीने दुसऱ्या गेममध्ये ८-२ अशी आघाडी घेतली. मग, लियांग व वँग जोडीने आघाडी १३-७ अशी वाढवली. यानंतर चीनच्या जोडीने सातत्याने गुणांची कमाई करीत सामना १-१ असा बरोबरीत आणला. निर्णायक गेममध्ये आपली हीच लय कायम राखत त्यांनी गेमसह सामना जिंकला.