Lalit Modi On Yuvraj Singh: आयपीएल स्पर्धेला २००८ मध्ये सुरूवात झाली होती. या स्पर्धेची सुरूवात करण्यात ललित मोदीने मोलाची भूमिका बजावली होती. ही स्पर्धा जगातील सर्वात यशस्वी क्रिकेट लीग स्पर्धा ठरली. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकल क्लार्कला दिलेल्या मुलाखतीत ललित मोदीने काही मोठे खुलासे केले आहेत. ललितने हरभजन सिंग आणि एस श्रीसंथ यांच्या २००८ मध्ये झालेल्या वादाच्या व्हिडीओची क्लीप शेअर केली होती. या व्हिडीओवर श्रीसंथच्या पत्तीने देखील संतप्त प्रतिक्रिया दिली. आता त्याने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २००७ स्पर्धेबाबत एक मोठा खुलासा केला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिली टी-२० वर्ल्डकप स्पर्धा २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत रंगली होती. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत करत भारतीय संघाने जेतेपदाचा मान पटकावला होता. या स्पर्धेआधी ललित मोदीने भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊन भारतीय खेळाडूंना भेट घेतली. ड्रेसिंग रूममध्ये जाऊन त्याने भारतीय खेळाडूंना मोठी ऑफर दिली होती. जो खेळाडू सलग ६ चेंडूत ६ षटकार मारेल किंवा ६ चेंडूत ६ गडी बाद करेल, त्याला माझ्याकडून पोर्श कार भेट म्हणून दिली जाईल.

या स्पर्धेत सलग ६ चेंडूत ६ षटकार कोणी मारले होते, हे वेगळं सांगायची गरज नाही. इंग्लंडविरूद्ध झालेल्या सामन्यात युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकात सलग ६ चेंडूत ६ षटकार मारले होते. युवराजने सलग ६ षटकार मारल्यानंतर ललित मोदीला, “माझी पोर्श कार कुठंय?” असं विचारलं होतं.

ललित मोदी हा किस्सा सांगताना म्हणाला, ” युवराज माझ्याकडे पाहत होता. त्याने बॅट हवेत उचलली आणि माझ्याकडे धावत आला आणि म्हणाला, माझी पोर्श कार कुठं आहे? यावर उत्तर देत मी त्याला म्हटलं होतं की, आधी तुझी बॅट मला दे.”

ललित मोदीने आपलं वचन पूर्ण केलं होतं. सलग ६ चेंडूंवर ६ षटकार मारणाऱ्या युवराज सिंगला ललित मोदीने पोर्श कार भेट म्हणून दिलं होतं. तर युवराज सिंगने ज्या बॅटने सलग ६ षटकार मारले होते,ती बॅट अजूनही ललित मोदीच्या घरी आहे.