इंग्लंडला क्रिकेटचे माहेरघर मानले जाते. ब्रिटिशांमुळे जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत क्रिकेटचा प्रसार झाला. इंग्लंडमध्ये आजही पारंपरिक काऊंटी क्रिकेटला फार महत्त्व आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात जुना प्रकार अशी काऊंटीची ओळख आहे. काऊंटी क्रिकेट खेळणे ही आजही खेळाडूंसाठी मोठी प्रतिष्ठेची गोष्ट मानली जाते. आतापर्यंत काही भारतीय खेळाडूंनी देखील काऊंटी क्रिकेट खेळलेले आहे. त्यामध्ये आता लवकरच वॉशिंग्टन सुंदरचेही नाव समाविष्ट होणार आहे. लँकशायर क्रिकेट क्लबने आगामी ५० षटकांच्या चषकासाठी आणि काऊंटी चॅम्पियनशिपसाठी भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरला करारबद्ध करण्याची घोषणा केली आहे.

लँकशायरने आपल्या ट्विटर अकाऊंच्या माध्यमातून सुंदरला करारबद्ध केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. “भारतीय आंतरराष्ट्रीय खेळाडू वॉशिंग्टन सुंदरला करारबद्ध केल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. युनायटेड किंग्डमचा व्हिसा मंजूर झाल्यानंतर वॉशिंग्टन क्लबमध्ये दाखल होईल. साधारण पुढील महिन्यात तो अमिरात ओल्ड ट्रॅफर्ड येथे त्याच्या नवीन सहकाऱ्यांना भेटेल,” असे ट्विट लँकशायर क्रिकेटने केले आहे.

गेल्या वर्षी जुलैमध्ये बोटाला दुखापत झाल्यानंतर सुंदर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांबच आहे. या दुखापतीमुळे तो गेल्या वर्षीच्या इंग्लंड दौऱ्यातून आणि २०२१मधील इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या टप्प्यापासून त्याला बाहेर पडावे लागले होते. सध्या तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर तो लवकरच क्रिकेटच्या मैदानावर दिसणार आहे.

हेही वाचा – Ranji Trophy 2022 Final: सैन्याच्या शाळेत प्रशिक्षण घेऊन अंतिम सामन्यात पोहचला मध्य प्रदेशचा संघ! ‘या’ व्यक्तीला जाते श्रेय

लँकशायरमध्ये सामील झाल्यानंतर सुंदरने आनंद व्यक्त केला, काऊंटी क्रिकेटमधून खूप काही शिकायला मिळेल असे त्याचे म्हणणे आहे. तो म्हणाला, “लँकशायर क्रिकेटसोबत प्रथमच काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. इंग्लिश परिस्थितीत खेळणे हा माझ्यासाठी एक चांगला अनुभव असेल. मी अमिराती ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळण्याची आतुरतेने वाट बघत आहे.” या संधीसाठी त्याने लँकशायर क्रिकेट आणि बीसीसीआय या दोघांचे आभार मानले आहेत.

लँकशायर सध्या काऊंटी चॅम्पियनशिप विभागातील गुणतालिकेत सरे आणि हॅम्पशायरच्या मागे तिसऱ्या स्थानावर आहे. व्हिटॅलिटी ब्लास्ट टी-२० सामन्यांनंतर ते २६ जूनपासून ग्लॉस्टरशायरविरुद्धच्या लढतीसह रेड-बॉल क्रिकेट पुन्हा सुरू करतील.