श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान कुलसेकरा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या क्रिकेट इतिहासात चामिंडा वास आणि लसिथ मलिंगा यांच्यानंतर नुवान कुलसेकरा हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक गडी टिपणारा वेगवान गोलंदाज होता. भारतात झालेल्या २०११ च्या विश्वचषक स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीने लगावलेला उत्तुंग विजयी षटकार नुवान कुलसेकरा याच्याच गोलंदाजीवर लगावलेला होता, त्यामुळे भारतीयांनाही तो चांगलाच लक्षात आहे.

३७ वर्षीय नुवान कुलसेकरा याने १८४ एकदिवसीय सामन्यांमध्ये १९९ बळी टिपले. तर ५८ टी २० सामन्यांत ६६ बळी माघारी धाडले. त्याने १५ वर्षाची कारकीर्द घडवली. त्यात २१ कसोटी सामन्यात त्याने ४८ गडी बाद केले. त्याने झिम्बाब्वेविरुद्ध २०१७ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला. त्यानंतर त्याने स्पर्धात्मक सामने खेळले नाहीत. २०१४ च्या टी २० विश्वचषक स्पर्धेत त्याने ८ गडी टिपत महत्वाची भूमिका बजावली होती.