जगातील प्रसिद्ध आणि ख्यातकीर्त व्यक्तींचे मेणाचे पुतळे साकारणाऱ्या लंडनस्थित मादाम तुसाँ या संग्रहायलाने भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांचा सत्कार करत त्यांच्या मेणाच्या पुतळ्याचे गुरुवारी अनावरण केले. खुद्द कपिल देव यांच्या हस्ते त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. मादाम तुसाँच्या दिल्लीतील शाखेत हा पुतळा ठेवण्यात आला आहे.
मादाम तुसाँ संग्रहालयात आतापर्यंत अमिताभ बच्चन, शाहरुख खान, कतरिना कैफ, राष्ट्रपिता महात्मा गांधी, सचिन तेंडुलकर, जॅकी चेन यांच्यासह इतर काही प्रसिद्ध कलावंतांचे मेणाचे पुतळे ठेवण्यात आले आहेत.
कपिल देव यांनी १९८३ साळी भारताला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकून दिला होता. अष्टपैलू कपिल देव त्यावेळी कसोटी विश्वात ४३४ विकेट घेणारे अव्वल गोलंदाज होते. याशिवाय त्यांनी झिम्बाब्वे विरुद्ध साकारलेली नाबाद १७५ धावांची खेळी अविस्मरणीय ठरली होती. भारताच्या १७ धावांवर पाच विकेट पडल्या असताना कपिल देव यांनी मैदानात टीच्चून फलंदाजी करत संघाला ८ बाद २६६ धावांपर्यंत मजल मारून दिली होती. कपिल देव यांनी १५ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत भारताला महत्त्वपूर्ण विजय मिळवू दिले. जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांना ओळखले गेले.