Lionel Messi India Tour Schedule: मेस्सीने १४ वर्षांपूर्वी (२०११) भारतात सामना खेळला होता. “भारत दौऱ्यावर जाणं हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे, भारत हा एक अतिशय खास देश आहे आणि १४ वर्षांपूर्वीच्या माझ्या आठवणी माझ्या मनात अजूनही आहेत. भारतातील फुटबॉल चाहते आणि त्यांचं प्रेम कमाल होतं.”
तो म्हणाला, “भारत हा फुटबॉलप्रेमी देश आहे. मला भारतीय चाहत्यांच्या नव्या पिढीला भेटण्याची उत्सुकता आहे. आयोजकांनी आधीच १५ ऑगस्ट रोजी या दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलं होतं आणि गुरुवारी मेस्सीच्या निवेदनाने त्याला अधिकृत दुजोरा दिला.
कसं असणार मेस्सीचं भारत दौऱ्यावरील वेळापत्रक?
लिओनेल मेस्सी चार शहरांचा भारत दौरा १३ डिसेंबरला कोलकात्यातून सुरू करणार आहे. त्यानंतर तो अहमदाबाद, मुंबई आणि नवी दिल्ली येथे जाणार आहे. या दौऱ्याचा समारोप १५ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन होणार आहे. या दौऱ्यात अर्जेंटिनाचा हा सुपरस्टार विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे.
मेस्सीच्या विविध कार्यक्रमांमध्ये कॉन्सर्ट, चाहत्यांसह भेटीगाठीचं सत्र, ‘फूड फेस्टिव्हल’, फुटबॉल मास्टरक्लास आणि अगदी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये पॅडल प्रदर्शन सामनाही आयोजित करण्यात येणार आहे. कोलकात्यातील मेस्सीचा कार्यक्रम सॉल्ट लेक स्टेडियममध्ये होणार आहे आणि विशेष म्हणजे मेस्सी दुसऱ्यांदा या स्टेडियमला भेट देणार आहे.
१३ डिसेंबरला मेस्सी ‘GOAT कॉन्सर्ट’ आणि ‘GOAT कप’मध्ये सहभाही होईल. या GOAT कपमध्ये मेस्सीबरोबर सौरव गांगुली, बायचुंग भूटिया आणि लिएंडर पेस यांसारखे भारतीय क्रीडापटूही न असण्याची शक्यता आहे. आयोजकांनी दुर्गा पूजा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मेस्सीचं २५ फूट उंच भित्तिचित्र अनावरण करण्याची योजना देखील आखली आहे. ८ ऑक्टोबरपासून मेस्सीच्या या कार्यक्रमांसाठीची तिकिटं डिस्ट्रिक्ट अॅपवर उपलब्ध असतील.