वृत्तसंस्था, ब्यूनोस आयर्स
कारकीर्दीत अखेरच्या टप्प्यावर असलेला अर्जेंटिनाचा वलयांकित फुटबॉलपटू लिओनेल मेसीने गुरुवारी विश्वचषक पात्रता स्पर्धेत व्हेनेझुएलावरील ३-० अशा विजयात दोन गोल करून घरच्या प्रेक्षकांचा भावनिक निरोप घेतला. लढतीला सुरुवात होण्यापूर्वी सरावादरम्यान मेसी भावुक झाला होता. त्याला अश्रूही अनावर झाले, पण याचा त्याच्या खेळावर विपरीत परिणाम झाला नाही.
मेसीची फुटबॉल कारकीर्द पुढील वर्षीच्या विश्वचषकापर्यंत कायम राहणार आहे. मात्र, मायदेशातील त्याचा हा अखेरचा सामना होता. ‘‘अशी कामगिरी करणे माझे स्वप्न होते. मी या मैदानावर अनेक गोष्टी अनुभवल्या आहेत. मायदेशात घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणे हे कायमच आनंददायी आणि वेगळा अनुभव देणारे असते,’’ असे मेसी म्हणाला.
मेसीला निरोप देण्यासाठी एस्टाडिओ मोन्युमेंटल मैदानावर चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. मायदेशातील अखेरचा सामना असला, तरी फुटबॉल कारकीर्द इतक्यात संपविणार नसल्याचे मेसीने संकेत दिले. विश्वचषक २०३०च्या पात्रता फेरीचे सामने २०२७ मध्ये सुरू होतील, तेव्हा मेसी ४० वर्षांचा असेल. पुढील वर्षीचा विश्वचषक खेळणे हे आपले उद्दिष्ट असल्याचे मेसी म्हणाला. मात्र, त्यानंतर काय होणार हे सांगू शकत नाही, असे त्याने स्पष्ट केले.
यापूर्वीच विश्वचषक पात्रता सिद्ध केलेल्या अर्जेंटिनासाठी मेसीने ३९ आणि ८०व्या मिनिटाला, तर लौटारो मार्टिनेझने ७६व्या मिनिटाला गोल केला. व्हेनेझुएला प्रथमच विश्वचषक खेळण्यासाठी उत्सुक असून, त्यांचे १८ गुण झाले आहेत. त्यांचा सातवा क्रमांक असून, आंतरखंडीय ‘प्ले-ऑफ’मध्ये खेळण्याची त्यांना संधी आहे.
अन्य पात्रता फेरीच्या सामन्यात उरुग्वेने पेरुचा ३-०, कोलंबियाने बोलिव्हियाचा ३-० असा पराभव केला. पॅराग्वे आणि इक्वेडोर यांच्यातील लढत गोलशून्य बरोबरीत सुटली.
विश्वचषकात पात्रता मिळविलेले संघ
पुढील वर्षीच्या ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेसाठी यजमान म्हणून अमेरिका, मेक्सिको, कॅनडा यांनी आपोआप पात्रता मिळविली आहे. आशियातून जपान, इराण, जॉर्डन, दक्षिण कोरिया, उझबेकिस्तान, ऑस्ट्रेलिया; ओशियानातून न्यूझीलंड; दक्षिण अमेरिकेतून ब्राझील, अर्जेंटिना, इक्वेडोर, उरुग्वे, कोलंबिया, पॅराग्वे यांनी पात्रता सिद्ध केली आहे. विश्वचषक २०२६ स्पर्धेत प्रथमच ४८ संघ सहभागी होणार असून, यातील १६ संघ युरोपमधून पात्र ठरतील.