राजकोट स्टेडियमवरील पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडच्या संघाकडे १६३ धावांची आघाडी आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावातील ५३७ धावांचा पाठलाग करणाऱया भारतीय संघाचा डाव ४८८ धावांत संपुष्टात आला. त्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावात ४९ धावांची घेता आली. दुसऱया डावात इंग्लंडच्या सलामीवीरांनी मैदानात टीच्चून फलंदाजी करत शतकी भागीदारी रचली आहे. इंग्लंडच्या हसीब हमीद याने आपले पहिलेवहिले कसोटी अर्धशतक पूर्ण केले, तर कर्णधार कूक देखील अर्धशतकाच्या जवळ पोहोचला आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडची धावसंख्या बिनबाद ११४ अशी असून हमीद नाबाद ६२ , तर कूक ४६ धावांवर खेळत होते. इंग्लंडने १६३ धावांची आघाडी घेतली आहे. इंग्लंडचा दुसरा डाव स्वस्तात गुंडाळण्याची आवश्यकता असताना भारतीय गोलंदाज निराशाजनक कामगिरी करत असल्याने कसोटी जिंकण्याची शक्यता धूसर होताना दिसत आहे.
आजच्या दिवसाची सुरूवातच भारतीय संघासाठी निराशाजनक राहिली. पहिल्या सत्रात विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे हे दोन महत्त्वपूर्ण विकेट्स मिळविण्यात इंग्लंडच्या गोलंदाजांना यश आले. खेळ सुरू झाल्याच्या तासाभरानंतर अजिंक्य रहाणे(१३) अन्सारीच्या फिरकीवर क्लीनबोल्ड झाला. तर विराट कोहली ४० धावांवर ‘हीट विकेट’ होऊन माघारी परतला. रशीदच्या फिरकीवर मिड विकेटच्या दिशेने फटका मारताना कोहलीच्या पायाचा यष्टीला स्पर्श झाला आणि बेल्स खाली पडल्या. त्यामुळे कोहलीला ‘हीट विकेट’ बाद होऊन माघारी परतावे लागले. कोहली आणि रहाणे ही आश्वासक जोडी सकाळच्या पहिल्याच सत्रात माघारी परतल्यामुळे चिंता व्यक्त होत असताना अश्विनने साहाच्या साथीने मैदानात जम बसविण्यास सुरूवात केली. दोघांनी अर्धशतकी भागीदारी रचून संघाला ४०० चा टप्पा गाठून दिला
उपहारापर्यंतच्या आकडेवारीनुसार भारतीय संघाची धावसंख्या ६ बाद ४११ अशी होती. दुसऱया सत्रात अश्विनने आपली संयमी खेळ करत अर्धशतकी खेळी साकारली. अश्विनने आंतरराष्ट्रीय कसोटीमधील आपले ७ वे अर्धशतक यावेळी पूर्ण केले. वृद्धीमान साहा ३५ धावांवर बाद झाला. त्यानंतर जडेजा देखील काही खास कामगिरी करू शकला नाही. जडेजाला १३ धावांवर झेलबाद होऊन माघारी परतावे लागले. पुढे ठराविक अंतरानंतर भारताचा विकेट्स पडत गेल्या आणि संघाचा पहिला डाव ४८८ धावांत संपुष्टात आला.
तत्पूर्वी, तिसऱया दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या ४ बाद ३१९ अशी होती. सामन्याचा तिसरा दिवस भारतीय फलंदाजांनी खेळून काढला. भारताकडून चेतेश्वर पुजारा आणि मुरली विजय यांनी शतकी खेळी साकारली. दोघांच्या शतकाच्या जोरावर भारतीय संघाला चांगली धावसंख्या करता आली. तिसऱया दिवसाच्या सुरूवातीलाच सलामीवीर गौतम गंभीर २९ धावांवर बाद झाला होता. स्टुअर्ट ब्रॉडने गंभीरला पायचीत केले. गंभीर बाद झाल्यानंतर मुरली विजयने चेतेश्वर पुजाराच्या साथीने संघाच्या धावसंख्येला आकार देण्यास सुरूवात केली. दोघांनीही मैदानात जम बसवून इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. पुजाराने राजकोटच्या मैदानावर आपले ९ वे आतंरराष्ट्रीय कसोटी शतक पूर्ण केले, तर त्याच्यापाठोपाठ मुरली विजयने देखील आपले शतक गाठले. तिसऱया दिवसाच्या दुसऱया सत्रापर्यंत पुजारा-विजय जोडी इंग्लंडसाठी डोकेदुखी ठरली.
पुजाराने आपल्या तंत्रशुद्ध फटक्यांचा नजराणा पेश करत १७ चौकारांच्या साथीने शतकी खेळी साकारली, तर मुरली विजयने ८ चौकार आणि तीन ३ षटकांच्या मदतीने शतक पूर्ण केले. तिसऱया सत्रात भारताला तीन धक्के बसले. चेतेश्वर पुजारा स्लिपमध्ये १२४ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर मुरली विजयने कोहलीच्या साथीने संयमी फलंदाजी करत संघाला ३०० चा आकडा गाठून दिला. तिसऱया दिवसाचा खेळ संपण्यासाठी अवघ्या काही षटकांचा खेळ शिल्लक असताना मुरली विजयने विकेट टाकली. मुरली विजय १२६ धावांवर हमीदच्या गोलंदाजीवर शॉर्ट लेगवर हमीदकरवी झेलबाद झाला.
Cricket Score of India vs England : दिवसभरातील अपडेट्स-