रोहित शर्माच्या २६४ धावांच्या ऐतिहासिक कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने उभ्या केलेल्या ४०५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव २५१ धावांवर संपुष्टात आला आहे.
भारतीय संघाने चौथ्या सामना देखील आपल्या खिशात घातला आहे.
भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचे तीन फलंदाज स्वस्तात माघारी परतले होते. श्रीलंकेच्या चंडिमल, परेरा आणि जयवर्दनेला भारतीय गोलंदाजांनी आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर परतीचा मार्ग दाखवला. त्यानंतर संघाचा डाव सावरण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिलकरत्ने दिलशानला स्टुअर्ट बिन्नीने आपल्या फिरकी जाळ्यात ओढून झेलबाद केले. त्यानंतर कर्णधार मॅथ्यूजने दमदार फलंदाजी करत अर्धशतक ठोकून डाव सावरला खरा पण, अक्षर पटेलने मॅथ्यूजला ७५ धावांवर आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर श्रीलंकेचा संघ पूर्णपणे कोसळला.
चौथ्या सामन्यात भारतीय संघात संधी देण्यात आलेल्या रोहितने लंकेच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. कर्णधार विराट कोहलीने रोहीतला चांगली साथ देत ६६ धावांची खेळी साकारली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणाऱया टीम इंडियाचे पहिले दोन फलंदाज स्वस्तात माघारी परतले. सलामीवर अजिंक्य राहणे २८ तर, अंबाती रायुडू अवघ्या ८ धावा करून बाद झाला. त्यानंतर कोहलीने कर्णधारी खेळी करत रोहीतला साथ दिली. कोहली ६६ धावांवर धावचित बाद झाला. त्यानंतर मैदानावर आलेल्या सुरेश रैनाने सुरूवातीपासूनच फटकेबाजीला सुरूवात केली. पण, फटकेबाजीच्या नादात रैना ११ धावांवर झेलबाद झाला. याआधीच्या तिन्ही सामन्यात भारताने दणदणीत विजय साजरा करून ही मालिका आपल्या खिशात टाकली असल्याने या सामन्यात भारतीय संघाकडून नवे प्रयोग करण्यात आले आहेत. रोहीत शर्माला या सामन्यात संघात स्थान मिळाले आणि रोहीतने आपल्या ऐतिहासिक खेळीने आपल्या निवडीला सार्थ ठरविले आहे.
लाईव्ह स्कोअर-
संग्रहित लेख, दिनांक 13th Nov 2014 रोजी प्रकाशित
भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय
कोलकाताच्या इडन गार्डनवर सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्याचे लाईव्ह अपडेट्स
First published on: 13-11-2014 at 02:56 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Live cricket score india vs sri lanka 4th odi