सलाह, ओरिगी यांच्या कामगिरीमुळे अंतिम फेरीत टॉटेनहॅम हॉटस्परवर २-० असा विजय

लिव्हरपूलचा गुणवान फुटबॉलपटू मोहम्मद सलाहला गतवर्षी खांद्यावर कोसळल्यामुळे चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या अंतिम फेरीतून माघार घ्यावी लागली होती; परंतु यंदा त्याने गतवर्षांची कसर भरून काढत संघाला पहिल्या दोन मिनिटांतच आघाडी मिळवून दिली. त्यानंतर डिव्होक ओरिगीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केल्यामुळे लिव्हरपूलने टॉटेनहॅम हॅटस्परवर २-० असा विजय मिळवून तब्बल १४ वर्षांनंतर विजेतेपदाची संधी साधली.

गतवर्षी रेयाल माद्रिदविरुद्ध लिव्हरपूलला ३-१ असा पराभव पत्करावा लागला होता. यंदा मात्र विजेतेपदाच्या निर्धारानेच लिव्हरपूलचे खेळाडू मैदानात परतले होते. सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला सॅडिओ मानेने ४० यार्डावरून झळकावलेला चेंडू टॉटेनहॅमच्या सिसकोच्या हाताला लागल्याने पंचांनी लिव्हरपूलला पेनल्टी बहाल केली. सलाहने ही संधी न गमावता ह्य़ुगो लॉरिसला सहज चकवले आणि लिव्हरपूलने दुसऱ्याच मिनिटाला १-० अशी आघाडी घेतली.

यानंतर संपूर्ण सामन्यात उभय संघांमध्ये गोल करण्यासाठी कमालीची चुरस पाहायला मिळाली. मध्यंतरानंतर ५८व्या मिनिटाला रॉबर्ट फर्मिन्होच्या जागी ओरिगीला बदली खेळाडू म्हणून पाठवण्याचा निर्णय लिव्हरपूलचे प्रशिक्षक जर्गेन क्लोप यांनी घेतला. त्यांचा हा निर्णय ओरिगीने योग्य ठरवला. सामना संपायला अवघी तीन मिनिटे शिल्लक असताना ओरिगीने संघासाठी दुसरा गोल झळकावला. जोएल मॅटिपने कॉर्नरवरून केलेल्या पासचे ओरिगीने गोलमध्ये रूपांतर केले आणि संपूर्ण संघाने विजेतेपदाच्या आवेशात जल्लोष केला.

  • लिव्हरपूलने सहाव्यांदा चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद पटकावले. रेयाल माद्रिद १३ विजेतेपदांसह या यादीत अव्वल स्थानी आहे.
  • सलाहने दुसऱ्या मिनिटाला नोंदवलेला गोल हा चॅम्पियन्स लीगच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जलद गोल ठरला.
  • यंदाच्या हंगामात शेवटच्या १० मिनिटांत तब्बल ७० गोल नोंदवले गेले.

सहा वेळा अंतिम फेरीत मजल मारूनही आम्हाला विजेतेपद हुलकावणी देत होते, मात्र या वेळी आम्ही विजेतेपद मिळवलेच. लिव्हरपूलच्या सुवर्णकाळाची ही फक्त सुरुवात आहे. चाहत्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच हे शक्य झाले. नव्या हंगामात आम्ही पुन्हा एकदा शून्यापासून सुरुवात करू!     – जर्गेन क्लोप, लिव्हरपूलचे प्रशिक्षक