इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल

लंडन : लिओनेल मेसीच्या शानदार कामगिरीमुळे बार्सिलोनाने लिव्हरपूलचे चॅम्पियन्स लीग फुटबॉलमधील आव्हान उपांत्य फेरीत जवळपास संपुष्टात आणले आहे. मात्र इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉलमध्ये अखेरच्या आठवडय़ात लिव्हरपूल आणि मँचेस्टर सिटी यांच्यात विजेतेपदासाठी खरी चुरस रंगणार आहे.

इंग्लिश प्रीमियर लीगच्या गुणतालिकेत मँचेस्टर सिटी ३६ सामन्यांत ९२ गुणांसह अग्रस्थानी असून लिव्हरपूलने तितक्याच सामन्यांत ९१ गुणांची कमाई करून दुसरे स्थान पटकावले आहे. त्यामुळे या आठवडय़ात रंगणाऱ्या अखेरच्या दोन सामन्यांत विजय मिळवून विजेतेपद पटकावण्याकडे दोन्ही संघांचे लक्ष लागले आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून एकाही संघाने एकही गुण गमावलेला नाही. गतविजेत्या मँचेस्टर सिटीने सलग १२ सामने जिंकले असून या मोसमात फक्त एकच सामना गमावलेला आहे. शनिवारी न्यूकॅसलविरुद्ध होणाऱ्या सामन्यात लिव्हरपूलला पराभव पत्करावा लागला, तर मँचेस्टर सिटीला सोमवारीच लिसेस्टर सिटीविरुद्ध होणाऱ्या सामन्यात विजेतेपद पटकावण्याची संधी मिळेल. मात्र दोन्ही संघ विजयी ठरले तर विजेतेपदाचा फैसला रविवारी होणाऱ्या अखेरच्या सामन्यात लागेल. लिव्हरपूलला अखेरच्या सामन्यात वोल्व्सशी तर मँचेस्टर सिटीला ब्रायटनशी झुंज द्यावी लागेल.

अव्वल चार जणांमध्ये स्थान मिळवण्यासाठी टॉटेनहॅम, चेल्सी, अर्सेनल आणि मँचेस्टर युनायटेड यांच्यात चुरस रंगणार आहे. टॉटेनहॅम ७० गुणांसह तिसऱ्या, चेल्सी ६८ गुणांसह चौथ्या, अर्सेनल ६६ गुणांसह पाचव्या तर युनायटेड ६५ गुणांसह सहाव्या स्थानी आहे. अव्वल चार जणांमध्ये स्थान मिळवणाऱ्या संघांना पुढील वर्षीच्या चॅम्पियन्स लीगसाठी थेट प्रवेश मिळणार आहे.