चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धा
उपांत्य फेरीची पहिली लढत आज; लिओनेल मेसीच्या कामगिरीकडे सर्वाच्या नजरा
युरोपियन फुटबॉलमधील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी संघांमध्ये चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीचे युद्ध रंगणार आहे. काही दिवसांपूर्वीच २६ वेळा ला लीगा करंडकावर नाव कोरणाऱ्या बार्सिलोनाचा आत्मविश्वास उंचावला आहे. आता २०१५नंतर चॅम्पियन्स लीगची अंतिम फेरी गाठण्याकडे बार्सिलोनाचे लक्ष लागले आहे.
दोन्ही संघ सध्या चांगली कामगिरी करत असल्यामुळे बुधवारी मध्यरात्री रंगणाऱ्या उपांत्य फेरीच्या पहिल्या टप्प्यातील सामन्याकडे संपूर्ण विश्वाचे लक्ष लागले आहे. बार्सिलोनाने २०१५ मध्ये चॅम्पियन्स लीगचे अखेरचे जेतेपद पटकावले होते. त्यामुळे बार्सिलोनाच्या जेतेपदाच्या मार्गात लिव्हरपूलचाच मुख्य अडथळा असणार आहे. विशेष म्हणजे, लिव्हरपूलविरुद्धच्या या सामन्यासाठी बार्सिलोनाचा संपूर्ण संघ सज्ज असून ते ४-३-३ या रणनीतीसह मैदानात उतरणार आहेत. अव्वल खेळाडू लिओनेल मेसी आणि लुइस सुआरेझसह फिलिपे कुटिन्हो किंवा औसमाने डेम्बेले हे आघाडीची धुरा सांभाळणार आहेत. मेसीने या मोसमात ४५ सामन्यांमध्ये ४६ तर चॅम्पियन्स लीगमध्ये १० गोल केले असून त्याच्यावरच बार्सिलोनाची मुख्य भिस्त असणार आहे.
बार्सिलोनाची या मोसमातील कामगिरी खूपच चांगली झाली असून त्यांनी फक्त चार सामने (ला लीगामध्ये दोन आणि कोपा डेल रे स्पर्धेत दोन) गमावले आहेत. लेव्हान्टेविरुद्ध विजय मिळवत त्यांनी गेल्या पाच वर्षांत चौथ्यांदा ला लीगा स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली. चॅम्पियन्स लीगमध्ये या मोसमात अपराजित राहिलेला बार्सिलोना हा एकमेव संघ असून त्यांनी गेल्या २२ सामन्यांत एकही हार पत्करलेली नाही. चॅम्पियन्स लीगमध्ये बार्सिलोनाला फक्त तीन वेळा लिव्हरपूला अडसर दूर करता आला नव्हता. मात्र लिव्हरपूलविरुद्धच्या गेल्या १५ सामन्यांपैकी फक्त एकच सामना बार्सिलोनाने गमावला आहे.
दुसरीकडे, इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत मँचेस्टर सिटी आणि लिव्हरपूल यांच्यात अग्रस्थानासाठी जबरदस्त चुरस रंगली आहे. लिव्हरपूलने गेल्या १० सामन्यांत दणदणीत विजय मिळवले आहेत. बायर्न म्युनिक, टॉटेनहॅम आणि चेल्सी यांच्यावरील विजयांमुळे लिव्हरपूलचा आत्मविश्वास उंचावला आहे. या वर्षीचा पीएफएचा सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकावणारा व्ॉन डिक, अँड्रय़ू रॉबर्टसन, ट्रेंट अलेक्झांडर-आरनॉल्ड, सादियो माने आणि मोहम्मद सालाह यांच्यावर लिव्हरपूलची मदार असणार आहे.
रॉबेटरे फिरमिनो याला दुखापतीमुले शुक्रवारी हडर्सफिल्डविरुद्ध झालेल्या सामन्याला मुकावे लागले होते. त्याचबरोबर डोक्याला जबर मार बसल्यामुळे फॅबिन्हो हासुद्धा या सामन्यात खेळू शकला नव्हता. अॅडम ललाना याच्या समावेशाविषयीही साशंकता असल्यामुळे प्रशिक्षक जर्गेन क्लोप यांनी जो गोमेझ, जोएल मॅटिप आणि जेम्स मिलनेर यांना परत बोलावले आहे.
संभाव्य संघ
बार्सिलोना (४-३-३) : मार्क आंद्रे टेर-स्टेगन (गोलरक्षक), जॉर्डी अल्बा, क्लेमेंट लेंगलेट, गेरार्ड पिक, नेल्सन सेमेडो, इव्हान राकिटिक, सर्जियो बस्केट्स, आर्थर, फिलिपे कुटिन्हो, लुइस सुआरेझ, लिओनेल मेसी.
प्रशिक्षक : एर्नेस्टो वाल्वेर्डे
लिव्हरपूल (४-३-३) : अॅलिसन (गोलरक्षक), अँड्रय़ू रॉबर्टसन, विर्जिल व्ॉन डिक, जोएल मॅटिप, ट्रेंट अलेक्झांडर-आरनॉल्ड, नॅबी केईटा, फॅबिन्हो, जॉर्डन हेंडरसन, मोहम्मद सालाह, रॉबेटरे फिरमिनो, सादियो माने.
प्रशिक्षक : जर्गेन क्लोप
२२ बार्सिलोनाला गेल्या २२ सामन्यांत एकदाही पराभवाचा सामना करावा लागला नसून गेल्या आठवडय़ात त्यांनी ला लीगा फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
१० लिव्हरपूलने सर्व स्पर्धामध्ये सलग १० सामने जिंकले असले तरी या मोसमात त्यांनी चॅम्पियन्स लीगमधील प्रत्येक बाहेरच्या मैदानावरील सामन्यात गोल पत्करला आहे.
४ बार्सिलोनाच्या घरच्या मैदानावर लिव्हरपूल चार वेळा अपराजित राहिला आहे. त्यांनी दोन सामने बरोबरीत तर दोन सामने जिंकले आहेत.