राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन नागपूर येथे करण्यात आले, ही बाब नागपूरसाठी गौरवास्पद आहे. बॉक्सिंग क्षेत्रातील मेरी कोम हे अनेकांचे आदर्श स्थान असून अशा प्रकारच्या स्पर्धांमधूनच भावी मेरी कोम तयार होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. सिव्हिल लाईन्स येथील राणीकोठी येथे नागपूर महानगरपालिका व नागपूर महानगर बॉक्सिंग असोसिएशन, बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने सब ज्युनियर गर्ल्स नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशीपचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजयी खेळाडूंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पदक देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना फडणवीस बोलत होते.

देशातील खेळाडू विविध क्रीडा प्रकारांमध्ये घवघवीत यश मिळवित आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील देदीप्यमान यश आपण सर्वजण पाहात आहोत. खेळ हे मोठे करिअर असून याला प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात येत आहे. राज्यातही विविध क्रीडा प्रकारांमध्ये खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येत आहे. विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये अव्वल यश संपादन केलेल्या खेळाडूंना थेट भरतीद्वारे शासन सेवेत समाविष्ट करुन घेण्यात येत आहे.

महाराष्ट्रातून एशियाड व ऑलिम्पिकच्या सन २०२० व २०२४मधील स्पर्धांसाठी देशाचे प्रतिनिधित्व करणा-या खेळाडूंची निवड प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासाठी खेळाडूंना आवश्यक सुविधा देण्यात येणार आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याचप्रमाणे आगामी स्पर्धांमध्येही राज्यातून सर्वाधिक पदक विजेते खेळाडू तयार होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.