आयपीएलचे दोनदा जेतेपद पटकावणारा, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या मालकीचा आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारा चेन्नई सुपर किंग्ज आणि आयपीएलचे पहिले जेतेपद पटकावणारा राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांचे दोन वर्षांसाठी निलंबन करण्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय समितीने दिला आहे. त्याचबरोबर श्रीनिवासन यांचा जावई आणि चेन्नई संघाचा माजी संचालक गुरुनाथ मयप्पन आणि राजस्थानच्या संघाचा सहमालक राज कुंद्रा हे दोघेही सट्टेबाजीप्रकरणी दोषी आढळले असून यांच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली आहे, यानंतर या दोघांनाही क्रिकेटशी निगडित कुठल्याही गोष्टींशी संबध ठेवता येणार नाही. या निर्णयांमुळे सभ्य गृहस्थांचा समजला जाणाऱ्या क्रिकेटला काळिमा फासला गेल्याचे म्हटले जात आहे. २०१३ साली झालेल्या आयपीएलच्या स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणाची सुनावणी करताना माजी न्यायमूर्ती आर. एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय समितीने हा निर्णय दिला आहे. ‘‘लाचलुचपत प्रतिबंधक संहितेतील २.२.१ या कलमानुसार क्रिकेट या खेळामध्ये सहभागी होण्यासाठी मयप्पनवर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर ७.५ कलमानुसार मयप्पनवर क्रिकेटशी निगडित गोष्टींशी संबंध ठेवण्यावर आजीवन बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर ६ कलमातील ४.२ नियमांनुसार मयप्पनवर कुठल्याही प्रकारच्या क्रिकेट सामन्याशी संबंधित राहण्यावरही आजीवन बंदी घालण्यात आली आहे,’’ अशी माहिती लोढा यांनी पत्रकार परीषदेमध्ये दिली. राजस्थानच्या संघाचा सहमालक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रालाही मयप्पनप्रमाणेच शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा निर्णय देण्यासाठी या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये समितीची स्थापना केली होती. चेन्नई सुपर किंग्ज हा संघ इंडिया सिमेंट आणि राजस्थान रॉयल्स हा संघ जयपूर आयपीएल यांच्या मालकीचा होता. न्या. लोढा म्हणाले.. * क्रिकेट हा खेळ वृद्धिंगत व्हावा, यासाठी चेन्नई सुपर किंग्ज या संघाने बरेच कार्य केले असल्याचा प्रतिवाद या वेळी इंडिया सिमेंट या कंपनीने केला, पण त्यांच्या या कार्यामुळे या प्रकरणाची गंभीरता कमी होत नाही, मयप्पन हा चेन्नईच्या संघाशी निगडित होता, पण सट्टेबाजीप्रकरणी मयप्पन दोषी आढळल्यावरही चेन्नईच्या संघाने त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. * आम्ही मोठय़ा प्रमाणात युवा खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून दिले, असा प्रतिवाद जयपूर आयपीएलने केला. पण त्यांचे तीन खेळाडू आयपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळले आहेत. त्यानुसार संघाला योग्य प्रकारे काहीच हाताळता आले नाही, हे निदर्शनास येत आहे. राज कुंद्रा हा राजस्थानच्या संघाचा सहमालक आहे. त्यामुळे त्याने घेतलेल्या निर्णयांचा फटका राजस्थानच्या संघाबरोबर बीसीसीआय आणि आयपीएललाही बसला. * या साऱ्या प्रकरणामुळे क्रिकेटच्या प्रतिमेला काळिमा फासला गेला. क्रिकेटची प्रतिमा डागाळली गेली आहे. या साऱ्या प्रकरणांमुळे खेळाची प्रतिमा स्वच्छ आहे की नाही, याबद्दल चाहत्यांच्या मनात साशंकता असून यामुळे बीसीसीआय आणि आयपीएल यांच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. * मयप्पन हा चेन्नईच्या संघाचा अधिकारी असून तो सट्टेबाजीमध्ये मोठय़ा प्रमाणात गुंतलेला होता. त्याचबरोबर स्वत:च्या संघावरही त्याने बऱ्याचदा सट्टा लावला होता. मयप्पनला नियमितपणे आयपीएलच्या सामन्यांवर सट्टा लावण्याचे व्यसन होते. तो स्वत:हून मोठय़ा प्रमाणात पैसे लावत होता आणि आतापर्यंत त्याला या सट्टेबाजीमध्ये ६० लाख रुपयांचा तोटा झाल्याचे निदर्शनास आले आहे. * वैयक्तिक दु:खापेक्षा मयप्पनने क्रिकेटच्या प्रतिमेला लावलेला बट्टा ही मोठी आणि गंभीर गोष्ट आहे. या साऱ्या गोष्टींनी जर खेळाची प्रतिमा डागाळली जात असेल आणि सन्मान गमावला जात असेल, तर शिल्लक काय राहिले? मयप्पन हा गेली चाळीस वर्षे क्रिकेट पाहत आला आहे आणि तो स्वत:ला निस्सीम क्रिकेटप्रेमी म्हणवत असेल तर त्याच्याकडून असे कृत्य घडूच कसे शकते? * मयप्पनसारखेच कृत्य कुंद्राने केले आहे. राजस्थानच्या संघाचे सीओओ सुंदर रमन यांच्याबाबतीतील कागदपत्रे आम्ही तपासत आहोत आणि याबाबत आम्ही यापुढेही तपास करणार आहोत. या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विवेक प्रियदर्शनी यांची नियुक्ती केली आहे. * परस्पर हितसंबंध जपले जात असल्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे. या प्रकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आम्ही संघाच्या मालकांशी याबाबत चर्चा करणार आहोत. या गोष्टींवर अजून प्रकाशझोत टाकण्याची गरज आहे. आम्ही ४०-४५ व्यक्तींशी याबाबत चर्चा केली आहे. अजून काही व्यक्तींनी याबाबत आम्ही भेटणार आहोत, यामध्ये क्रिकेटच्या मालकांबरोबर, क्रिकेट प्रशासक आणि काही राजकारण्यांची यामध्ये आम्ही समावेश केला आहे. बीसीसीआयने निर्णय घ्यावा आता यापुढे या संघांचे काय करायचे, नवीन मालकांना या संघांची मालकी द्यायची का, हा निर्णय बीसीसीआयने घ्यायला हवा. आम्ही याबाबत त्यांना कोणतीही शिफारस केलेली नाही, नियमांच्या मते जे योग्य असेल तो निर्णय बीसीसीआयने घ्यायला हवा. खेळाडूपेक्षा खेळ मोठा निलंबित करण्यात आलेल्या संघांबरोबर खेळाडू कायम राहतील, असे मला वाटत नाही. त्यांनी या संघांशी काहीही संबंध ठेवू नये. क्रिकेट हा खेळ खेळाडूंपेक्षा नेहमीच मोठा आहे. त्यामुळे आर्थिक नुकसानापेक्षा खेळाची प्रतिष्ठा ही नेहमीच महत्त्वाची असते.