आठवडय़ाची मुलाखत : जसप्रीत बुमराह, मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज
शेवटच्या षटकांमध्ये अचूक टप्प्यावर यॉर्कर गोलंदाजी करीत प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांवर दडपण आणणारा वेगवान गोलंदाज, अशी ओळख मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराहने निर्माण केली आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध केल्यानंतर आता भारताच्या कसोटी संघातून खेळण्याचे स्वप्न बुमराहने गेली अनेक वष्रे जोपासले आहे. कसोटी खेळल्याशिवाय कोणत्याही क्रिकेटपटूचे व्यावसायिक क्रिकेट अधुरे आहे, अशी बुमराहची धारणा आहे. ११ एकदिवसीय सामन्यांत २२ बळी आणि २४ ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये ३३ बळी मिळवणाऱ्या बुमराहला भविष्याचा बराच विचार करण्यापेक्षा वास्तवात जगायला नेहमी आवडते. आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेच्या पाश्र्वभूमीवर बुमराहशी केलेली खास बातचीत-
- भारताकडून आणि मुंबई इंडियन्सकडून खेळताना सध्या तू शेवटच्या षटकांमध्ये हुकमी गोलंदाजी करणारा देशातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहेस. याचे रहस्य काय?
कठोर मेहनत हेच याचे खरे रहस्य आहे. जबाबदारी यशस्वीपणे पेलता आल्यावर त्याचा आनंद होणे, हे स्वाभाविक आहे. बालपणी मी बरेचसे टेनिस बॉल क्रिकेट खेळलो. त्यामुळे यॉर्कर्स गोलंदाजी करण्यात माझा हातखंडा आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणसुद्धा झाले नसताना मुंबई इंडियन्सने माझी आयपीएलकरिता निवड केली, याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. २०१३ मध्ये मुंबई इंडियन्सच्या चमूत सामील झाल्यावर माझ्या कारकीर्दीला झळाळी मिळाली. गेल्या काही वर्षांत अनेक दिग्गज क्रिकेटपटूंकडून माझा खेळ सुधारण्यासाठी आवश्यक अशा बऱ्याच गोष्टी मी शिकलो.
- तुझ्या कारकीर्दीला दिशादर्शक मार्गदर्शन कुणाचे ठरले?
मुंबई इंडियन्स संघातील वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाचे. मार्गदर्शनासाठी सदैव तत्पर असणारी ही असामी आहे. बालपणीपासून माझा तो आवडता गोलंदाज होता. त्याला भेटण्याची माझी इच्छा खेळामुळे पूर्ण झाली. फलंदाजाने आक्रमक फटका खेळून चेंडू सीमापार धाडल्यावरसुद्धा पुढील चेंडू टाकताना शांतपणे आपले लक्ष केंद्रित करण्याचा त्याचा सल्ला मला नेहमी उपयुक्त ठरत आहे. मलिंगा आणि ब्रेट ली हे माझ्या कारकीर्दीतील प्रेरणादायी खेळाडू आहेत, असे मी आवर्जून सांगेन.
- लसिथ मलिंगा, मिचेल मॅक्क्लिनॅघन, मिचेल जॉन्सन आणि टिम साऊदी यांच्यासारखे जगातील सर्वोत्तम चार वेगवान गोलंदाज मुंबई इंडियन्सच्या संघात आहेत. त्यांचे मार्गदर्शन किंवा सल्ले कसे उपयुक्त ठरतात?
गोलंदाजीचे प्रशिक्षक शेन बाँडच्या नावाचासुद्धा या यादीत समावेश केल्यास मुंबईच्या संघात जगातील पाच सर्वोत्तम गोलंदाजांचा सहवास लाभतो आहे. अर्थातच, या आजी-माजी अनुभवी गोलंदाजांचे मार्गदर्शन माझ्यासारख्या युवा क्रिकेटपटूंना लाभत असते. मुंबईच्या संघातील वातावरण अतिशय हलकेफुलके असल्यामुळे शिकण्यासाठी सर्वाकडून नेहमी स्वागत असते.
- महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्या नेतृत्वाखाली तू भारतीय संघातून खेळलास. कठीण प्रसंगांत त्यांनी बऱ्याचदा तुझ्यावर विश्वास टाकला. तो सार्थ ठरवत कामगिरी उंचावणे कशा प्रकारे साध्य व्हायचे?
धोनी आणि कोहली या दोघांनी नेहमीच माझ्यातील क्षमता आणि प्रवृत्तीला पाठिंबा दिला. कर्णधाराचा विश्वास कोणत्याही गोलंदाजासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. सामन्यातील स्थितीचे तारतम्य या दोघांनाही उत्तम आहे. त्यानुसार ते मला संधी देतात. हाच विश्वास मी सार्थ ठरवतो.
- तुझे महाराष्ट्राशी काय नाते आहे?
माझे आजोळ मुंबईचे. त्यामुळे माझी आई जन्मापासून डोंबिवलीची. विवाहानंतर अहमदाबादला ती स्थायिक झाली. अगदी माझा जन्मसुद्धा डोंबिवलीतच झाला आहे.
