|| ऋषिकेश बामणे
आठवडय़ाची मुलाखत: सुधांशू मित्तल, भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष
पुरुषांच्या खो-खो लीगमुळे खेळाचा मोठय़ा प्रमाणावर प्रसार होईल आणि हा प्रयोग यशस्वी ठरल्यावर लवकरच महिलांसाठीदेखील खो-खो लीग आयोजित करू, असा आशावाद भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल यांनी व्यक्त केला.
नवी दिल्ली येथे २ एप्रिलला देशातील पहिल्यावहिल्या खो-खो लीगची अधिकृत घोषणा करण्यात आली. खो-खोसारख्या पारंपरिक मैदानी खेळाला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी उचललेले हे पाऊल येणाऱ्या काळात युवा पिढीला अधिक प्रेरणादायी ठरेल, असे मत मित्तल यांनी व्यक्त केले. खो-खो क्रीडा प्रकाराच्या वाटचालीतील आव्हानांविषयी मित्तल यांच्याशी केलेली ही खास बातचीत-
- खो-खो लीगची आता कशाप्रकारे तयारी सुरू आहे?
गेल्या दोन-तीन वर्षांपासून आम्ही या लीगच्या आयोजनाविषयी प्रयत्न करत होतो, मात्र आता प्रत्यक्षात त्याची घोषणा झाल्यामुळे संघटनेचा अध्यक्ष म्हणून मला फार आनंद होत आहे. यंदा ऑक्टोबरमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यापूर्वी जून-जुलै दरम्यान खेळाडूंची लिलाव प्रक्रिया होण्यासाठी संघटना प्रयत्न करत आहे. या लिलावात सहभागी होणाऱ्या आठ संघांना आपल्या संघात १३ ते १५ खेळाडूंनाच (किमान चार विदेशी खेळाडूंसह) निवडता येईल. लिलाव प्रक्रिया झाल्यानंतरच स्पर्धेची अंतिम रूपरेषा व स्वरूप निश्चित केले जाईल. मुंबई, पुणे, बेंगळूरु, अहमदाबाद आणि दिल्ली या पाच शहरांपैकी कोणत्याही तीन ठिकाणी स्पर्धेचे आयोजन करण्यावर आमचा भर आहे.
- महिलांच्या खो-खो लीगसाठी किती काळ प्रतीक्षा करावी लागेल?
पुरुषांच्या लीगदरम्यान महिलांचे दोन प्रायोगिक सामने आयोजित केले जातील. यावरून आम्हाला विदेशी महिला खेळाडूंच्या तंदुरुस्तीचा आणि आपल्या चाहत्यांच्या पाठिंब्याचा एक अंदाज येऊ शकेल. त्याशिवाय पुरुषांच्या लीगला कशाप्रकारे प्रतिसाद लाभतो, हेदेखील महिलांच्या लीगसाठी महत्त्वपूर्ण आहे. मात्र तूर्तास तरी महिलांसाठी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या स्पर्धाचे आयोजन नियमितपणे सुरू राहील. किंबहुना पुढील वर्षी महिलांच्या खो-खो लीगचे बिगूल वाजू शकते.
- खो-खोच्या प्रचार-प्रसारासाठी ही लीग कितपत उपयुक्त ठरेल?
महाराष्ट्रात आणि दक्षिणेकडील राज्यांत खो-खो मोठय़ा प्रमाणावर खेळला जातो. मात्र या लीगमुळे विदेशांतही खो-खो कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचेल. त्याशिवाय हा खेळ अधिक वेगवान करण्याच्या उद्देशाने फक्त लीगसाठी नियमांमध्येसुद्धा काही आमूलाग्र बदल करण्यात येतील. त्यामुळे चाहत्यांना खो-खोकडे आकर्षित करता येईल.
- युवा पिढीचा खो-खोकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि एकंदर खेळाच्या सद्यस्थितीवर तुमचे काय मत आहे?
गेल्या काही वर्षांत खो-खोने अनेक नामांकित खेळाडू घडवले आहेत. त्याशिवाय १५ ते २० या वयोगटातील बहुतांश खेळाडू महत्त्वाचे पुरस्कार मिळवताना आढळतात. युवा पिढी खो-खोमध्ये कारकीर्द घडवण्यासाठी पुढे येत आहे, हे याचेच उत्तम उदाहरण आहे. त्याशिवाय आशियाई क्रीडा स्पर्धेत खो-खोचा सहभाग होण्याची शक्यता असल्यामुळे खेळाडूंना कामगिरी उंचावण्याची प्रेरणा मिळेल. येणाऱ्या काळात ‘खेलो इंडिया’सारख्या आणखी काही स्पर्धाचे शालेय स्तरावर आयोजन केल्यास खो-खोला सुगीचे दिवस येतील, याची मला खात्री आहे.