पीटीआय, लास वेगास

ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू अर्जुन एरिगेसीची ‘फ्री-स्टाइल चेस ग्रँडस्लॅम’च्या लास वेगास टप्प्यातील घोडदौड उपांत्य फेरीत संपुष्टात आली. एरिगेसीला अमेरिकेच्या लेवॉन अरोनियन याच्याकडून पराभव पत्करावा लागला.

एरिगेसीने या स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. ‘फ्री-स्टाइल चेस ग्रँडस्लॅम’मध्ये उपांत्य फेरी गाठणारा तो पहिला भारतीय बुद्धिबळपटू ठरला. मात्र, अरोनियनविरुद्ध त्याला सर्वोत्तम खेळ करण्यात अपयश आले. अरोनियनने या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली असून पाच वेळच्या जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला पराभूत करत त्याने बाद फेरी गाठली होती. उपांत्यपूर्व फेरीत त्याने अमेरिकेचा अव्वल बुद्धिबळपटू हिकारू नाकामुराला नमवले होते. एरिगेसीविरुद्ध त्याने हीच लय कायम राखली.

या दोघांमधील पहिल्या डावात अरोनियनची पटावरील स्थिती नाजूक होती. मात्र, त्याने भक्कम बचाव करत एरिगेसीला निर्णायक चाली रचण्यापासून दूर ठेवले. यानंतर एरिगेसीकडून चूक झाली आणि अरोनियनने सरशी साधली. परतीच्या डावात एरिगेसीला विजय अनिवार्य होता. या डावाच्या मध्यापर्यंत दोन्ही खेळाडू समान स्थितीत होते. मात्र, विजयाची गरज असल्याने एरिगेसीने धोका पत्करण्यास सुरुवात केली. हीच बाब अरोनियनच्या पथ्यावर पडली आणि त्याने सलग दुसरा विजय नोंदवला. अमेरिकेचा अन्य ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू हान्स निमनने आपल्याच देशाच्या फॅबियानो कारुआनाला पराभूत करत स्पर्धेत आगेकूच केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रज्ञानंदचा विजय

जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर झालेला भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने तिसऱ्या ते आठव्या क्रमांकासाठी सुरू असलेल्या लढतींत जर्मनीच्या व्हिन्सेन्ट केमेरवर मात केली. या दोघांमधील पहिला डाव बरोबरीत सुटल्यानंतर दुसऱ्या डावात पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना प्रज्ञानंदने बाजी मारली. त्याने ही लढत १.५-०.५ अशी जिंकली. अन्य लढतीत, विश्वातील अव्वल बुद्धिबळपटू कार्लसनने उझबेकिस्तानच्या जावोखिर सिंदारोवचा अशाच फरकाने पराभव केला. अमेरिकेच्या वेस्ली सो याने उझबेकिस्तानचा नोदिरबेक अब्दुसत्तोरोव, तर लिनिएर डोमिंगेझ पेरेझने नाकामुरावर मात केली.