Lucknow Super Giants 2026 Retain And Relesed Players List: आयपीएल २०२५ स्पर्धेआधी लखनौ सुपर जायंट्स संघाने मोठा बदल केला होता. केएल राहुलने संघाची साथ सोडल्यानंतर लखनौ सुपर जायंट्सने ऋषभ पंतची २७ कोटींची विक्रमी बोली लावली आणि आपल्या संघात स्थान दिलं. पण संघाचा कर्णधार बदलूनही संघाच्या कामगिरीत सुधारणा झाली नव्हती. हा संघ प्लेऑफमध्येही प्रवेश करू शकला नव्हता. गुणतालिकेत हा संघ सातव्या स्थानी राहिला होता.

या संघात विक्रमी बोली लागणाऱ्या ऋषभ पंतसह एडन मारक्रम, डेव्हिड मिलर, आवेश खान, मिचेल मार्श आणि आकाश दीप सारखे खेळाडू देखील होते. पण या खेळाडूंनाही संघाला विजय मिळवून देण्यासाठी मोलाचं योगदान देता आलं नव्हतं. ऋषभ पंत गेल्या हंगामातील शेवटच्या काही सामन्यांमध्ये धावा केल्या, पण सुरूवातीच्या सामन्यांमध्ये तो पूर्णपणे फ्लॉप ठरला होता.

ऋषभ पंतवर लावली होती विक्रमी बोली

गेल्या हंगामात केएल राहुलने लखनौ सुपर जायंट्स संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या संघाला यष्टीरक्षक आणि अनुभवी कर्णधाराची गरज होती. दुसरीकडे ऋषभ पंत देखील दिल्लीची साथ सोडून लिलावात आला होता. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्स संघाकडे नामी संधी होती. ही संधी साधून लखनौ सुपर जायंट्सने ऋषभ पंतवर २७ कोटींची विक्रमी बोली लावली आणि ऋषभ पंतला आपल्या संघात स्थान दिलं.

लखनौ सुपर जायंट्सने कोणत्या खेळाडूंना आपल्या संघात स्थान दिलं?

लखनौ सुपर जायंट्सने आगामी हंगामापूर्वी अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीला आपल्या संघात स्थान दिलं आहे. गेल्या हंगामात शमी हैदराबादकडून खेळताना दिसून आला होता. पण आगामी हंगामापू्र्वी लखनौ सुपर जायंट्सने १० कोटी रूपये मोजून त्याला आपल्या संघात स्थान दिलं आहे. तर मुंबई इंडियन्सचा अर्जुन तेंडुलकर ३० लाखांच्या मुळ किंमतीत लखनौ सुपर जायंट्स संघात दाखल झाला आहे. गेल्या हंगामात लखनौ सुपर जायंट्सकडून खेळलेला शार्दुल ठाकूर २ कोटी रूपयात मुंबई इंडियन्स संघात दाखल झाला आहे.

आयपीएल २०२६ स्पर्धेसाठी लखनौ सुपर जायंट्सने रिटेन केलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी

अब्दुल समद, आयुष बडोनी, एडन मारक्रम, हिम्मत सिंह, मॅथ्यू ब्रिटझके, ऋषभ पंत, निकोलस पुरन, मिचेल मार्श, शाहबाज अहमद, अर्शीन कुलकर्णी, अर्जुन तेंडुलकर, मोहम्मद शमी, मयंक यादव, आवेश खान, दिग्वेश राठी, मोहसीन खान, एम सिद्धार्थ, प्रिंस यादव, आकाश सिंह

आयपीएल २०२६ स्पर्धेसाठी लखनौ सुपर जायंट्स संघाने रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी

डेविड मिलर, आर्यन जुयाल, युवराज चौधरी, राजवर्धन हंगरगेकर, शमार जोसेफ, आकाशदीप, रवि बिश्नोई