ग्लासगो येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पध्रेत पदकांची कमाई करणाऱ्या राज्यातील खेळाडूंवर राज्य सरकारनेही बक्षिसांचा वर्षांव केला आहे. या स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणाऱ्या खेळाडूला ५० लाख तर रौप्यपदक विजेत्याला ३० लाख आणि कांस्यपदक विजेत्यांना प्रत्येकी २० लाख रुपयांचे इनाम देण्यात येणार आहे. या स्पर्धेत राज्यातील ‘पंचरत्नांनी’ एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य पदकांची कमाई केली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेत्यांचा राज्य सरकारतर्फे सन्मान करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी क्रीडाक्षेत्राला उल्हासित करणारा निर्णय घेताना राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत पदक मिळविणाऱ्या खेळाडूंच्या बक्षिसाच्या रकमेत मोठी वाढ केली आहे. त्यानुसार सुवर्णपदक विजेत्या राही सरनोबत (नेमबाजी) हिला आता १० लाखांऐवजी ५० लाख रुपये, रौप्यपदक विजेत्या अयोनिका पॉल (नेमबाजी) साडेसात लाखांऐवजी ३० लाख तर कांस्य पदक विजेते गणेश माळी, ओंकार ओतारी व चंद्रकांत माळी (वेटलिफ्टिंग) यांना प्रत्येकी पाच लाखांऐवजी २० लाख रुपये देण्यात येणार आहेत.
खेळाडूंसोबतच प्रशिक्षकांच्या बक्षिसांच्या रकमेतही राज्य शासनाने मोठी वाढ केली आहे. त्यानुसार प्रशिक्षकांना अनुक्रमे अडीच लाखांऐवजी साडेबारा लाख, एक लाख ८७ हजार ५०० रुपयांऐवजी साडेसात लाख आणि सव्वा लाखाऐवजी पाच लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. आंतरराष्ट्रीय स्पध्रेत यश मिळवणाऱ्या राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने त्यांना शासकीय सेवेत विविध पदांवर सामावून घेण्याचा निर्णय याआधीच घेतला आहे. नेमबाज राही सरनोबतची उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रकुल स्पध्रेतील इतर पदक विजेत्यांनाही याप्रमाणे शासकीय सेवेत घेण्यात येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Aug 2014 रोजी प्रकाशित
राष्ट्रकुल विजेत्या पंचरत्नांना इनाम
ग्लासगो येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पध्रेत पदकांची कमाई करणाऱ्या राज्यातील खेळाडूंवर राज्य सरकारनेही बक्षिसांचा वर्षांव केला आहे.

First published on: 06-08-2014 at 12:59 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government award to medal winner in commonwealth games