मुंबई : मंत्रिपद न मिळालेल्या महायुतीच्या उमेदवारांमध्ये अद्याप नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी आता महामंडळाच्या वाटपावर सरकारकडून भर दिला जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महायुतीमधील तिन्ही पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत महामंडळ वाटपावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

मंत्रिपद न मिळाल्याने महामंडळांच्या शोधात असलेल्या आमदारांनी आतापासूनच यासाठी ‘लॉबिंग’ सुरू केले आहे. या वाटपामुळे पक्षांतर्गत असंतोष कमी होईल असे महायुतीतील घटक पक्षांचे मत आहे. महामंडळाच्या वाटपाबाबत समन्वय समितीच्या तीन-चार बैठका झाल्या आहेत. त्यामध्ये महामंडळाचे वाटप कशापद्धतीने व्हावे, कोणती महामंडळे कोणाकडे असावीत यावर एका महिन्यात तिन्ही पक्षप्रमुखांच्या नेतृत्वाखाली अंतिम निर्णय होईल आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीआधी यावर शिक्कामोर्तब होईल, असे सामंत म्हणाले.

संख्याबळानुसार महामंडळाचे वाटप?

राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर तिन्ही पक्षांच्या संख्याबळानुसार मंत्रिपदाचे वाटप करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर महामंडळाचेही वाटप होणार आहे. यामध्ये मोठा भाऊ असलेल्या भाजपाला सर्वात जास्त तर त्या खालोखाल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला महामंडळे येणार असल्याचे समजते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लवकरच राज ठाकरेंची भेट

आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना (शिंदे) आणि मनसे युती होणार का यावर स्पष्टीकरण करताना राज ठाकरेंना मी यापूर्वी अनेकदा भेटलेलो आहे. त्यावेळी राजकीय चर्चा झालेली नाही. एकनाथ शिंदे सुद्धा भेटले तेव्हा राज ठाकरेंनी त्यांना जेवणाचे निमंत्रण दिले होते. त्यावेळी मीसुद्धा उपस्थित होतो. तेथे फक्त बाळासाहेब ठाकरे यांनी संघटना स्थापन केल्यानंतरचे अनुभव काय होते, त्यांनी कशापद्धतीने भाषणे केली, यासंदर्भात चर्चा झाल्या. युतीच्या बाबतीत लपून कशाला भेटायचे, असा प्रतिसवाल करीत युतीसंदर्भात राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकत्र बसून निर्णय घेतील असे सांगताना पुढील आठ-दहा दिवसांत ठाकरे यांना भेटणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.