Maharashtra Kesri Kusti : पुण्यातल्या फुलगावमद्ये सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा निकाल हाती आला आहे. गतविजेत्या शिवराज राक्षेला आस्मान दाखवत सिकंदर शेखने महाराष्ट्र केसरी हा पुरस्कार जिंकला आहे. मानाची गदा उंचावत त्याने उपस्थितांना अभिवादन केलं आणि आपला विजय साजरा केला. सिकंदर शेख ६६ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरला आहे. Latest Marathi News

गतविजेत्या शिवराज राक्षेला आस्मान दाखवलं

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम फेरी ही महत्त्वाची होती. या फेरीत सिकंदरचे पारडे जड होते. मात्र शिवराज राक्षे त्याला आव्हान देईल असंही अनेकांना वाटत होतं. मात्र वेगवान आणि आक्रमक कुस्ती खेळणाऱ्या सिकंदरपुढे शिवराज राक्षेचा निभाव लागला नाही. लढत सुरु झाल्यानंतर झोळी डाव घेत शिवराजला उचलून खाली घेतले आणि चितपट करुन विजय मिळवला. माती विभागातून संदीप मोटेचा पराभव करुन सिकंदर शेखने अंतिम फेरी गाठली होती. तर गादी विभागातून हर्षद कोकाटेला पराभवाची धूळ चारत शिवराज राक्षे दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत धडकला होता. या दोघांमधली लढत अत्यंत चुरशीची झाली. या लढतीत शिवराज राक्षेचा पराभव करत सिकंदर शेखने मैदान मारलं आणि महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपलं नाव कोरलं.

कोण आहे सिकंदर शेख?

सिकंदर शेखचं मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातलं मोहोळ आहे. त्याच्या घरात आजोबांपासून कुस्तीची परंपरा आहे. सिकंदरचे वडील रशिद शेखही पैलवानी करायचे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत सिकंदर शेखने कुस्तीचे धडे गिरवले. तसंच हा पठ्ठ्या आता महाराष्ट्र केसरी या कुस्तीतल्या मानाच्या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. २२ वर्षांचा सिकंदर शेख हा कोल्हापुरातल्या गंगावेश तालमीतला पैलवान आहे. लहान वयातच त्याने मातब्बर पैलवानांना चितपट केलं आहे. सिकंदरची घरची परिस्थिती हलाखीची होती. मात्र आई आणि वडील या दोघांनीही त्याला पैलवान होण्यासाठी प्रोत्साहन दिलं.

२०१८ मध्ये मोहोळमध्ये सिकंदरने कुस्तीचा सराव सुरु केला होता. त्याच्या बरोबरीचे पैलवान त्यावेळी तालमीत नव्हते. त्यामुळे सिकंदरच्या वडिलांनी आणि वस्तादांनी कोल्हापुरातल्या गंगावेश तालमीत त्याला पाठवण्याचा निर्णय घेतला. कोल्हापुरातल्या गंगावेश तालमीत आल्यापासूनच त्याच्या पैलवानीला सुरुवात झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विजयानंतर काय म्हणाला सिकंदर शेख?

सिकंदर शेख आणि गतविजेता शिवराज राक्षे यांच्यात चुरशीचा सामना झाला. अवघ्या काही क्षणांमध्ये सिकंदर शेखरने शिवराज राक्षेला आस्मान दाखवलं आणि महाराष्ट्र केसरीची मानाची गदा तसंच महिंद्रा थार ही गाडी मिळवली. “माझ्या विजयाचं श्रेय माझे वडील आणि माझे कोच यांना जातं. मी मागचे सहा ते सात महिने कसून सराव केला. मला आता देशासाठी मेडल आणण्याची इच्छा आहे” असं सिकंदर शेखने म्हटलं आहे.