राष्ट्रीय खो-खो स्पर्धा

घरच्या मैदानावर होणाऱ्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेतील पुरुष व महिला या दोन्ही गटात विजेतेपद मिळवित दुहेरी मुकुट पटकाविण्याचे यजमान महाराष्ट्राचे ध्येय आहे. त्या दृष्टीने महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सराव शिबिरात जय्यत तयारी केली आहे.
बारामती येथे ८ ते १२ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघांचे सराव शिबिर सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर २२ नोव्हेंबरपासून सुरू होते. या शिबिराची सांगता गुरुवारी होत आहे. महाराष्ट्राने पुरुष गटात गेली दोन वर्षे उपविजेतेपद मिळविले आहे, तर महिलांमध्ये महाराष्ट्राने गेली दोन वर्षे अजिंक्यपद पटकाविले होते. महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांचे नेतृत्व अनुक्रमे नरेश सावंत (सांगली) व प्रियंका येळे (सातारा) यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
महाराष्ट्राच्या पुरुष संघाचे प्रशिक्षक श्रीरंग इनामदार यांनी संघाच्या कामगिरीबाबत आत्मविश्वास व्यक्त करीत सांगितले,की आमच्या संघातील निम्म्या खेळाडूंनी दोन ते तीन वेळा राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला आहे. संघातील उर्वरित खेळाडू नवोदित असले तरी या खेळाडूंनी फेडरेशन व विविध वयोगटाच्या राष्ट्रीय स्पर्धामध्ये महाराष्ट्राकडून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आक्रमण व संरक्षण या दोन्ही आघाडय़ांवर आमचे खेळाडू चमकदार कामगिरी करतील अशी आशा आहे.
महाराष्ट्रास गेली दोन वर्षे उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले असले तरी दोन्ही वेळा आमच्या संघास रेल्वे संघाकडून निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. रेल्वे संघातील बरेचसे खेळाडू महाराष्ट्राचेच आहेत. त्यामुळे आमच्या संघातील खेळाडूंवर थोडेसे दडपण असते. आपल्याच क्लबच्या वरिष्ठ खेळाडूंविरुद्ध खेळताना महाराष्ट्राच्या खेळाडूंचे मनोधैर्य अपेक्षेइतके कणखर राहत नाही. तथापि यंदा आत्मविश्वासाने खेळण्याची तयारी आमच्या खेळाडूंनी केली आहे असेही इनामदार यांनी सांगितले.
महिलांमध्ये विजेतेपदाची हॅटट्रिक पूर्ण करण्यासाठीच आम्ही उतरणार आहोत असे सांगून महाराष्ट्राचे प्रशिक्षक नरेंद्र कुंदर म्हणाले,‘‘ महाराष्ट्रास यंदा केरळचेच मुख्य आव्हान आहे. त्याखेरीज पुडुचेरी, पश्चिम बंगाल व दिल्ली यांच्याकडूनही चांगली लढत मिळेल असा अंदाज आहे. आमच्या संघात शिवछत्रपती पुरस्कार विजेती शिल्पा जाधव, राणी लक्ष्मीबाई पुरस्कार विजेती कीर्ति चव्हाण, जानकी पुरस्कार विजेत्या प्रियंका येळे व श्वेता गवळी यांच्यावर आमची मदार आहे. संरक्षणावरच आमची भिस्त असली तरी धारदार आक्रमण करण्यातही आमचे खेळाडू तयार आहेत.’’
 महाराष्ट्र संघ
पुरुष – नरेश सावंत (कर्णधार), तक्षक गौंडाजे, युवराज जाधव, किरण सावंत (सर्व सांगली), तेजस शिरसकर, अक्षय निंबरे, मनोज वैद्य (मुंबई), प्रतीक वाईकर, अनिकेत चऱ्हाटे (पुणे), तुषार मांढरे (ठाणे), प्रणय राऊळ (मुंबई उपनगर), विकास परदेशी (अहमदनगर), राखीव-रमेश सावंत, गणेश पवार, हृदयेश्वर सुरवसे. प्रशिक्षक : श्रीरंग इनामदार (पुणे), व्यवस्थापक : गणेश बनकर (औरंगाबाद).
महिला- प्रियंका येळे (कर्णधार), प्राजक्ता कुचेकर, करिश्मा नागरजी (सातारा), शिल्पा जाधव, कीर्ति चव्हाण, श्रुती सकपाळ (मुंबई उपनगर), सुप्रिया गाढवे, सारिका काळे (उस्मानाबाद), गौरी शेलार (पुणे), श्वेता गवळी (अहमदनगर), मीनल भोईर (ठाणे), सरिता चौडिये (औरंगाबाद), राखीव-सोनिया मिठबावकर, सीमा साबळे, मयूरी जावळे. प्रशिक्षक : नरेंद्र कुंदर, व्यवस्थापिका : विजयालक्ष्मी शर्मा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.