पीटीआय, चेन्नई

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या आगामी सामन्यांमध्ये आमच्या गोलंदाजांनी ‘व्हाइड’ आणि ‘नो-बॉल’चे प्रमाण कमी करावे. अतिरिक्त चेंडूंवर लगाम घालण्यात अपयश आल्यास त्यांना दुसऱ्या एखाद्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळावे लागेल, अशी सक्त ताकीद चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आपल्या गोलंदाजांना दिली आहे.

धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाने सोमवारी झालेल्या ‘आयपीएल’च्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सवर १२ धावांनी मात केली. चेन्नईच्या संघाला जवळपास चार वर्षांनंतर घरचे मैदान असलेल्या एमए चिदंबरम स्टेडियमवर सामना खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यात चेन्नईचा संघ विजयी ठरला असला, तरी गोलंदाजांच्या कामगिरीने कर्णधार धोनी फारसा प्रभावित झाला नाही. चेन्नईच्या गोलंदाजांनी या सामन्यात तीन ‘नो-बॉल’ आणि तब्बल १३ ‘व्हाइड’ चेंडू टाकले. त्यापूर्वी गुजरात टायटन्सविरुद्ध चुरशीच्या झालेल्या सलामीच्या लढतीत चेन्नईच्या गोलंदाजांनी चार ‘व्हाइड’ आणि दोन ‘नो-बॉल’ टाकले होते. गोलंदाज अतिरिक्त चेंडू टाकत असल्याने चेन्नईला निर्धारित वेळेत २० षटके संपवणे अवघड जात आहे. त्यामुळे धोनीवर दंडात्मक कारवाईचा धोका निर्माण झाला आहे. धोनीने गोलंदाजांना अतिरिक्त चेंडूंवर लगाम घालण्याची सूचना केली आहे.

‘‘आमच्या गोलंदाजांनी कमीत कमी ‘व्हाइड’ चेंडू आणि ‘नो-बॉल’ टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आमचे गोलंदाज बरेच अतिरिक्त चेंडू टाकत आहेत. पुढेही हे सुरू राहिल्यास त्यांना नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळण्याची सवय लावून घ्यावी लागेल. मला दुसऱ्यांदा ताकीद मिळेल आणि संघाबाहेर बसावे लागेल,’’ असे धोनी म्हणाला.