सार्थ प्रतिष्ठान आणि वंदे मातरम क्रीडा मंडळ यांच्यातर्फे व्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत महिंद्रा आणि पश्चिम रेल्वे आमनेसामने असणार आहेत. भारत पेट्रोलियमसमोर मुंबई पोलिसांचे आव्हान आहे. महिंद्राने मध्य रेल्वेचा प्रतिकार २७-१६ असा संपुष्टात आणला. महिंद्राच्या काशिलिंग आडकेने एका चढाईत ३ गडी टिपले. महिंद्राने रेल्वेवर ७व्या मिनिटाला लोण चढवला आणि १२-४ अशी आघाडी घेतली. १८व्या मिनिटाला दुसरा लोण चढवत महिंद्राने आघाडी २२-८ अशी भक्कम केली. मध्यंतरानंतर रेल्वेने थोडी आगेकूच केली. मात्र काशिलिंगने रेल्वेचा बचाव भेदत २ गडी टिपले. महिंद्राच्या विजयात काशिलिंग आडकेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
मुंबई पोलिसांनी एअर इंडियाचे आव्हान ३१-२८ असे परतावून लावले. महेश मोकल, विपुल मोकळ यांच्या झंझावाती चढायांनी एअर इंडियाचा विजय साकारला. भारत पेट्रोलियमने युनियन बँकेचा २०-७ असा पराभव केला. सुरजीत, दीपचंद यांच्या चढाया आणि आशिष म्हात्रे, विशाल माने यांच्या पकडी पेट्रोलियमच्या विजयात निर्णायक ठरल्या. पश्चिम रेल्वेने महाराष्ट्र पोलीस संघाला १७-९ असे पराभूत केले. सुनील सिंग, महिपाल, रमेश यांनी चतुरस्र खेळ करत पश्चिम रेल्वेला विजय मिळवून दिला.